
वसुलीसाठी ''महावितरण'' ग्राहकांच्या दारी
05878
इचलकरंजी : ग्राहकांची यादी घेऊन ‘महावितरण’ कर्मचारी दारोदारी जाऊन वसुली करताना दिसत आहे.
वसुलीसाठी ‘महावितरण’ ग्राहकांच्या दारी
इचलकरंजीत ३३ कोटी ६२ लाखांवर थकबाकी; सहकार्याचे आवाहन
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ : ग्राहकांकडे असलेली ३३ कोटी ६२ लाख १७ हजार रुपयांची वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी इचलकरंजीत ‘महावितरण’ने वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेतून थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. तेव्हा थकबाकीदार ग्राहकांनी थकित वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन ‘महावितरण’तर्फे करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष संपण्याची घाई सुरू असताना महावितरण कंपनीला वसुलीसाठी दारोदारी जाऊन कठोर पावले उचलावी लागत आहेत.
‘महावितरण’च्या इचलकरंजी विभागात यंदा थकबाकीचा डोंगर काहीसा कमी झाला आहे. कोरोनानंतर दोन वर्षे थकबाकीचा आकडा पश्चिम महाराष्ट्रात चिंताजनक होता. मात्र गतवर्षी वसुलीचे प्रमाण वाढल्यानंतर थकबाकी कमी झाली. यंदा २८ हजार ८१२ ग्राहकांकडून ३३ कोटी ६२ लाख १७ हजारांची थकबाकी आहे. यातील यंत्रमागाची फुगीर पोकळ थकबाकीही माफ झाल्याने कमी झाली आहे, तरीही वसुलीचा डोंगर तसा कमी नाही. एकूण थकबाकीपैकी २७ एचपीवरील यंत्रमागधारकांकडे ४० टक्के रक्कम आहे. त्यापाठोपाठ कृषिपंप, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती ग्राहकांचा नंबर लागतो. त्यामुळे ‘महावितरण’ला आहे त्या थकबाकीचा ‘शॉक’ बसल्याने महावितरणने वसुली मोहीम तीव्र केली आहे.
ग्राहकांकडून जुन्या व नवीन वीज बिल वसुलीसाठी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची फिरती पथके तयार केली आहेत. या पथकांतील कर्मचाऱ्यांकडून, तसेच मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून नोटीस बजावण्यात येत आहेत. निवासी, शेतीपंप, पथदीप, शासकीय व निमशासकीय थकित ग्राहकांनी बिल भरणा न केल्यास वीजजोडणी तोडण्याचा इशाराही दिला आहे. सध्या महावितरण कर्मचाऱ्यांना त्या-त्या भागातील १०० रुपयांच्या पुढील थकित ग्राहकांची यादी दिली आहे. ही यादी घेऊन कर्मचारी वसुली करताना दिसत आहे.
-----
कोट
दैनंदिन जीवन संपूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने बिलांचा भरणा करणे आवश्यक आहे. सध्या महावितरणच्या आर्थिक स्थितीचा गांभीर्याने विचार करून थकित व चालू वीजबिलांचा भरणा करून ग्राहकांनी सहकार्य करावे.
-नीरज अहुजा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, इचलकरंजी विभाग
------
कृषिपंपांच्या थकबाकीचा डोंगर वाढताच
किमान चालू देयकांची वसुली करण्याचे प्रयत्न ‘महावितरण’कडून करण्यात येत आहेत. मात्र, चालू देयक भरण्याकडेही कृषिपंपधारकांनी दुर्लक्ष केले असून त्यात दर तिमाहीत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. कृषिपंपांच्या वाढत्या थकबाकीने ‘महावितरण’ आर्थिक अडचणीत सापडली आहेत. कृषिपंपांच्या थकबाकीची मोठी समस्या असून, दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे. कृषिपंपांच्या जोडण्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे वसुली मात्र अतिशय नगण्य आहे.
---------
इचलकरंजी विभाग थकबाकी
विभाग* ग्राहक* रक्कम
घरगुती* १६७९२* १ कोटी ७० लाख ३५ हजार
वाणिज्य* १७९२*४६ लाख ७८ हजार
औद्योगिक* ९००* १ कोटी १५ लाख २८ हजार
यंत्रमाग २७ एचपीवरील* ११२८* १३ कोटी २८ लाख
यंत्रमाग २७ एचपीखालील* २२२५* २ कोटी ११ लाख
कृषिपंप* ५५१२* ७ कोटी ८८ लाख
पाणीपुरवठा* १४४*२ कोटी १३ लाख ८९ हजार
दिवाबत्ती* १३८* ४ कोटी ७२ लाख ८१ हजार
- -