
चांगले मित्र-मैत्रिणी निवडा
05955
05956
इचलकरंजी : अमली पदार्थ विरोधी आयोजित कार्यशाळेत बोलताना पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे. समोर उपस्थित विद्यार्थी.
-----------
चांगले मित्र-मैत्रिणी निवडा
महादेव वाघमोडे; इचलकरंजीत न्यू हायस्कूलमध्ये कार्यशाळा
इचलकरंजी, ता.३१ : अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे शेवट मृत्यू आहे. यामुळे देशाची प्रगती खुंटत आहे. हे टाळायचे असेल तर स्वतः सावध राहिले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्ने पहा, स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि चांगले मित्र-मैत्रिणी निवडा, असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेता तरुण पिढी अंमली पदार्थाच्या विळख्यात वाया जाऊ नये यासाठी समुपदेशन करण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्यामार्फत दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. श्री. वाघमोडे यांनी पीपीटी सादरीकरणातून व्यसन म्हणजे काय, अंमली पदार्थ कोणते, अमंली पदार्थांची जागतिक समस्या आणि भीषणता, शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणामांची गंभीरता याबाबत मार्गदर्शन केले. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीत वाढ होऊन दरोडा, खून, मारामाऱ्या या प्रकारात अतिगंभीर वाढ झाली आहे. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहून सावध राहायला हवे, असे सांगत श्री. वाघमोडे यांनी अंमली पदार्थ विरोधी विद्यार्थ्यांना शपथ दिली. इचलकरंजी शहरातील शाळा, महाविद्यालयात अशा प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलिस अंमलदार महेश गवळी यांनी व्यसनाची सुरुवात आणि ही सवय कशी जीवघेणी ठरते याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. प्रभारी उपशिक्षणाधिकारी केतन शिंदे, शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे, लघुलेखक राजू महिंद्रकर, अजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेस सरस्वती हायस्कूल, शाहू हायस्कूल, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय बी. ए. कोळी यांनी करून दिला. आभार व्ही. पी. मोरे यांनी मानले.
-----