नव्या दंडाच्या लोकजागृतीला रेड सिग्नल

नव्या दंडाच्या लोकजागृतीला रेड सिग्नल

06045
इचलकरंजी : मलाबादे चौकात वाहतूक नियम व दंडाचा जुना फलक अद्याप तसाच आहे.
------------------------------
नव्या दंडाच्या लोकजागृतीला रेड सिग्नल
जुने फलक तसेच; इचलकरंजी वाहनधारकांसाठी गैरसोयीचे

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : वाहतुकीची नवीन दंड आकारणी सुरू केली. मात्र जुन्या दंडाचे फलक जैसे थे आहेत. दुर्लक्षित झालेले हे फलक वाहनधारकांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत.
नवा दंड सुरु होऊन वर्ष उलटले तरी नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. तर जनजागृती आणि माहितीसाठी असणारे वाहतूक दंडाचे जुनेच बोर्ड शहरात दिसत आहेत. महानगरपालिका झाल्यापासून सर्व काही बदलत असून आता नव्या दंडाच्या फलकाला बदलाची प्रतीक्षा आहे. शहरात वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जाते. वाहनधारकांसाठी वाहतुकीचे नियम, कारवाईचे प्रकार, दंडात्मक कारवाई आणि रक्कम याची माहिती असणारे फलक लावले जातात. शहरात विविध चौकांसह वाहतूक शाखेच्या ठिकाणी असे फलक लावलेले आहेत. वर्षभरापूर्वी वाहतूकीची नवीन दंड आकारणी सुरू झाली आहे. पूर्वीच्या दंडात्मक कारवाईची रक्कम दुपटीने वाढली आहे. अशा कारवाईची, दंडाची माहितीचे सुधारित फलक शहरात पुन्हा दिसतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्ष नव्या दंड आकारणीनुसार वाहनधारकांवर कारवाई सुरू झाली मात्र शहरात जनजागृतीसाठी असे फलक कोठेही दिसले नाहीत. शहरात अनेक ठिकाणी जुनेच फलक धुळखात पडले आहेत.
जुन्या फलकांवर महाराष्ट्र शासन राजपत्राचा उल्लेख असून त्यावर इचलकरंजी नगरपरिषद असेच नमूद केले आहे. त्यामध्ये विविध वाहतूक गुन्ह्यांचे स्वरूप, कलम आणि दंडाचा समावेश आहे. महानगरपालिका अस्तित्वात झाल्यानंतर हे फलक बदलायला हवे. अथवा नव्या वाहतूक दंडाच्या कारवाईच्या स्वरूपासह फलक सुधारित करणे गरजेचे होते. मात्र शहरात वाहतूक नियम फलकांची स्थिती तशीच आहे. इचलकरंजीसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. वर्षाला कोट्यवधींच्या घरात वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र त्याच वाहनधारकांच्या माहिती व जनजागृतीसाठी वाहतूक नियमांचे साधे सुधारित फलक लावण्याचे कष्ट केलेले नाहीत.
------
सिग्नलच्या ठिकाणी फलक गरजेचे
एक वर्ष उलटले तरी नवीन वाहतूक नियम व दंडाबाबत वाहनधारकांना काहीच माहिती नसल्याचे कारवाईवेळी दिसून येते. याबाबत आम्हाला माहीत नाही अशी ओरड आजही आहे. त्यामुळे वाहतूक शाखा व परिवहन कार्यालयाने जुने फलक सुधारित करण्याबरोबरच प्रत्येक सिग्नल यंत्रणेच्या चौकात नवीन वाहतूक दंडाबाबत फलक उभारायला हवेत. तरच वाहनधारकांमध्ये अधिकपणे जनजागृती होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com