मोर्चा जमाव आक्रमक

मोर्चा जमाव आक्रमक

00093,0123


इचलकरंजी :१) हेर्ले येथील घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांच्यावतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.२) मोर्चा संपताच जमावाने रस्त्यावर सुरु ठेवलेले हातगाडे उलटे करत आपला संताप व्यक्त केला.
...

इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांचा भव्य मोर्चा

हेर्लेतील घटनेचा निषेधः काही काळ तणावाचे वातावरण , शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

इचलकरंजी, ता.२ : हेर्ले येथे महापुरुषांचे पोस्टर फाडल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना आज शहरात घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चा संपताच आक्रमक झालेल्या जमावाने रस्त्यावर सुरु ठेवलेले हातगाडे उलटे करत आपला संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गटागटाने जमाव फिरु लागल्याने व्यावसायिकांनी अघोषित व्यवहार बंद ठेवले. शहरातील संवेदनशील भागासह मुख्य मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेर्ले येथे महापुरुषांचे पोस्टर फाडल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी आज हिंदुत्ववाद्यांच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी भागाभागातून कार्यकर्ते मलाबादे चौकात जमले. त्यानंतर घोषणाबाजी करत हा मोर्चा मुख्यमार्गावरून निघाला. मोर्चा अपर पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन अपर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांना दिले. हेर्लेतील घटनेतील संशयितांवर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
मोर्चातील जमाव मुख्य मार्गावरुन शिवतिर्थाच्या दिशेने गेला. मात्र मलाबादे चौक परिसरात फळ विक्री सुरू असल्याने जमावाने फळ विक्रीचा गाडा उलटवला. त्यानंतर शिवतिर्थावर प्रेरणामंत्र झाले आणि पुन्हा जमाव गांधी पुतळ्याचे दिशेने फिरला. गांधी चौकात काहीजण फळ विक्री करत असल्याचे पाहून जमावाने पुन्हा संताप व्यक्त करत हातगाडे उलटून टाकले. या प्रकारानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे शहरात मुख्य मार्गासह भागाभागात व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी एसआरपी प्लाटूनसह मोठा बंदोबस्त दिवसभर शहरात तैनात ठेवला. दुपारनंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आले.
--------
आयजी, एसपी तळ ठोकून

शहरात तणावाचे वातावरण बनल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे हे दोघे आज शहरात आले. दोन्ही अधिकारी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी प्रसारमाध्यमांशी भेटण्याचेही टाळले. दरम्यान, मोर्चात आक्रमक होऊन हातगाड्यांची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांचा शोध घेतला जात होता. मात्र याबाबत रात्री उशिरार्यंत कोणत्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com