
वाहन गोदाम खाक
06412
इचलकरंजी : आगीत इलेक्ट्रिक गाड्यांचे गोदाम भस्ममात होवून वाहनांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत.
...
इलेक्ट्रिक गाड्यांचे गोदाम जळून खाक
इचलकरंजीत शॉर्टसर्कीटने दुर्घटनाः तब्बल ३७ वाहने भस्मसात
इचलकरंजी, ता.२ : येथील विक्रमनगरमधील इलेक्ट्रिक गाड्यांचे गोदाम जळून खाक झाल्याची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत तब्बल ३७ वाहने पूर्णतः भस्मसात झाली असून केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. अग्निशमन दलाने आगीवर वेळीच नियंत्रण आणल्याने कामगार वस्तीत पसरणारे आगीचे लोट थांबले. आगीत सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील विक्रमनगर परिसरात इलेक्ट्रिक वाहनांचे गोदाम आहे. या गोदामाच्या एका मोठ्या हॉलमध्ये इलेक्ट्रिक गाड्या तर दुसऱ्या हॉलमध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट व अन्य साहित्य ठेवले होते. आज पहाटेच्या सुमारास अचानक या गोदामातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. या घटनेने बाजूच्या शेडमध्ये झोपलेले कामगार जागे झाले. कामगारांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून गोदाम मालकाला आगीच्या घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल झाले. सुमारे चार बंबाच्या साहाय्याने एकसारखा पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. बाजूलाच असणाऱ्या कामगार वस्तीत पसरणाऱ्या आगीचे लोट थांबले. या घटनेत गोदामातील सर्व गाड्या, साहित्य, स्पेअरपार्ट जळून खाक झाले आहे. आगीत इलेक्ट्रिक रिक्षा, सायकल, मोपेड अशी ३७ वाहने तसेच कॉम्प्रेसर, सर्व्हिसिंग मशीन जळून एकूण ४० लाखांचे नुकसान झाले आहे. गाड्यांचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले असून गोदामाची दयनीय अवस्था झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शार्ट सर्कीटने आग लागल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
--------
दुरुस्तीला आलेल्या वाहनधारकांची गर्दी
जळून खाक झालेल्या इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये बहुतांश दुरुस्तीला आलेली वाहने आहेत. त्यामुळे आगीची माहिती समजताच अशा वाहनधारकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यांनी वाहन कंपनीच्या वितरकाकडे चौकशी करून वाहनांच्या भरपाईबाबत विचारणा केली. किरकोळ कामासाठी वाहनधारकांनी वाहने दाखल केली. मात्र आगीमुळे अशांवर वाहने गमावण्याची वेळ आली.