जबरी चोरी उघड

जबरी चोरी उघड

चैनीसाठी मुलानेच केला चोरीचा बनाव
कोरोची-तिळवणी मार्गावरील जबरी चोरीचा छडा
इचलकरंजी, ता.१० : भरदिवसा कोरोची-तिळवणी मार्गावर चाकूचा धाक दाखवून चौघांनी केलेल्या जबरी चोरीचा छडा कोल्हापूर स्थानिक गुन्हा शाखेने लावला आहे. मात्र, तपासात हा सर्व प्रकार बनाव असल्याचे उघड झाले आहे. घरातून चैनीसाठी पैसे मिळत नसल्याने मुलाने चार मित्रांच्या मदतीनेच ८० हजार रुपयांच्या जबरी चोरीचा बनाव केला आहे. विशेष म्हणजे तक्रारदार हाच गुन्ह्यातील मुख्य संशयित निघाला. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी प्रदीप संभाजी माळी (रा. भाटले मळा शहापूर) व त्याचा साथीदार मोहसीन मुल्ला या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सहा मार्चला दुपारच्या सुमारास कोरोची ते तिळवणी मार्गावरील लक्ष्मी इंडस्ट्रीज रस्त्यावर प्रदीप माळी याला चौघांनी कटर, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रदीप माळी याच्याकडील रोख ७९ हजार ५०० रुपये चोरून नेल्याप्रकरणी माळी याच्या फिर्यादीवरुरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा लुटमारीचा प्रकार घडल्याने त्वरित याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व शहापूर पोलिसांकडून समांतर तपास सुरू होता.
प्रदीप माळी याला चैनीसाठी व स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वडील पैसे देत नसल्याने मित्र मोहसीन मुल्ला याच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव केल्याचा दाट संशय आला. जबरी चोरीतील रक्कम माळी व मुल्ला दोघे विल्हेवाट लावण्यासाठी तिळवणी हद्दीतील विजयानगरी येथे प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे रोख ७५ हजार आणि मोबाईल असा ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्यक्तिगत गरजांसाठी जबरी चोरीचा बनाव केल्याची माहिती प्रदीप माळी याने दिली. पोलिसांनी माळी व मुल्ला या दोघांनाही अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र कळमळकर, उपनिरीक्षक शेष मोरे, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, संजय कुंभार, महेश खोत, यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली.
----
असा झाला तपास
माळी याने स्वतःच वार करून हात जखमी केल्याचा प्रथम संशय पोलिसांना आला. तसेच गुन्ह्याची हकीकत व प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजवरून माळी याच्या हालचालींमध्ये तफावती दिसून आल्या. यावरून कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com