नदी शोधण्याचे भारतीय तरुणाचे कार्य बेजोड

नदी शोधण्याचे भारतीय तरुणाचे कार्य बेजोड
Published on

लोगो : प्रबोधन-मनोरंजन व्याख्यानमाला
08731
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत नवव्या दिवशी ती गेली कुठे? या नदी शोधाच्या विलक्षण सत्यकथेवर विवेक मेहेत्रे यांचे व्याख्यान झाले.

नदी शोधण्याचे भारतीय तरुणाचे कार्य बेजोड
विवेक मेहेत्रे : ‘ती गेली कुठे?’ नदीच्या शोधाची सत्यकथा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ : किंटूक पंडित याने तिबेटमधील यार्लर शांग पो या नदीच्या खोऱ्यात पोहोचण्याचे धाडस केले आणि नदी जेथे गुप्त होते त्या जागेचा शोध घेतला. अरुणाचल प्रदेशातील प्रचंड मोठ्या ब्रह्मपुत्रा नदीसाठी ही शोधमोहीम होती. ब्रिटिशांच्या सेवेत नसलेल्या एका अशिक्षित भारतीय तरुणाने आयुष्याची वाताहात केली. सलग चार वर्षे कठोर निसर्गाशी झुंज देत ब्रिटिश सरकारच्या सर्व्‍हे ऑफ इंडियाच्या कामात दिलेले योगदान बेजोड आहे. जगात अनेक साहसवीर असतील. पण, एका अप्रसिद्ध भारतीय तरुणाने लुप्त झालेली नदी शोधण्यासाठी जे कार्य केले त्याला इतिहासात तोड नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक विवेक मेहेत्रे यांनी केले.
४६ व्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत नवव्या दिवशी ती गेली कुठे? या नदी शोधाच्या विलक्षण सत्यकथेचे व्हिडिओसह सादरीकरण करताना ते बोलत होते. पाहुणे म्हणून शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘मी २७ वर्षे या माणसाच्या कामाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, फार काही हाती लागत नव्हते. कर्नल एफ. एम. बेली यांनी तिबेट कमिशनचे जे रिपोर्ट तयार केले त्यातून व परिमल भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या बेल्स ऑफ शांग्रिला या पुस्तकाच्या माध्यमातून काही माहिती घेता आली. अजूनही माझा याबाबत अभ्यास सुरू असून, जगापुढे ही सत्यकथा मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
ते म्हणाले, ‘तिबेट प्रांत हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली नसल्याने या शोध मोहिमेत अनेक अडचणी होत्या. १८८० मध्ये लेफ्टनंट कर्नल हेनरी हरमन हे दार्जिलिंगला अधिकारी म्हणून आले होते. त्यांनी पुन्हा या कामाला चालना दिली. नदी गेली कुठे? याचा पुरावा सर्व्‍हेच्या कामात महत्त्वाचा होता. ब्रह्मपुत्रा नदी हीच तिबेटमधील यार्लर शांग पो आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आव्हान होते. हे आव्हान सिक्कीममधील अशिक्षित, गरीब शिंपी काम करणाऱ्या किंटूक याने स्वीकारून पूर्ण करून दाखवले. या लुप्त झालेल्या नदीचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मिळवून देणाऱ्या किंटूक पंडित याची ओळख जगायला व्हायला हवी यासाठी मी प्रयत्न करत आहे.'' श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
किंटूक सत्यकथा अन् निष्ठेची कहाणी
किंटूक याचा विचार करता हे कार्य पूर्ण करण्यासाठी ध्येयाविषयी आस्था असेल तरच यश साध्य करता येते, हे सिद्ध केले आहे. पंडित याची ही सत्यकथा म्हणजे विलक्षण जिद्दीची, चिकाटीची, कितीही संकटे आली तर आपला दिलेला शब्द पाळलाच पाहिजे यावरील निष्ठेची कहाणी आहे. त्याकाळी या अशिक्षित माणसाने काही साधने नसताना जे काही प्रचंड कार्य केले त्याची माहिती आज जगात फार लोकांना नसावी, याची खंत असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com