फायनान्स तगादा पत्रकार बैठक

फायनान्स तगादा पत्रकार बैठक

‘मायक्रो फायनान्स''बाबतच्या
तक्रारी पोलिसांकडून बेदखल

दिव्याताई मगदूम याचा आरोप ः छत्रपती शासन महिला आघाडीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २३ : मायक्रो फायनान्स म्हणून कर्ज देणाऱ्या एजंट महिलांकडून वसुलीसाठी महिलांना शिवीगाळसह मारहाण केली जात आहे. त्याचबरोबर जीवे मारण्याच्या धमक्या वारंवार दिल्या जात आहेत. याबाबत नावानिशी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांकडून काहीच कारवाई होत नाही. अशा बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने हजारो महिलांसह ठिय्या आंदोलन करू, असा इशारा छत्रपती शासनच्या राज्य महिलाध्यक्षा दिव्याताई मगदूम यांनी पत्रकार बैठकीत दिला.
मायक्रो फायनान्स कंपन्यांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंतच वसुलीचे आरबीआयचे निर्देश आहेत. मात्र, काही कंपन्यांचे कर्मचारी रात्री-अपरात्री महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावतात. त्यामुळे अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नेमलेले एजंट वसुलीसाठी तगादा लावण्यासह हप्ता थकल्यास अधिक व्याजदराने पैसेही उपलब्ध करुन देतात. याबाबत येत्या काही दिवसांत जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच महिलांसह ठिय्या आंदोलन करू असा इशारा मगदूम यांनी दिला आहे. यावेळी बिसमिल्ला दानवाडे, आसमा देसाई, रुकसाना पानारी, सिमरन मुल्ला, नाजनीज मोमीन, रेश्मा मणेर, मिनाज मोमीन, मिनाज इनामदार, नजरीन खान,अमन सनदी आदी उपस्थित होते.
-----
अहवालावर कारवाई शून्य
तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका समितीच्या माध्यमातून केलेल्या चौकशीत ४७ मायक्रो फायनान्स कंपन्या आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करत कर्जवाटप करत असल्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे. मात्र, अद्यापही त्यावर काहीच कारवाई केली नसल्याचे मगदूम यांनी यावेळी सांगितले.
----
पोलिसांचे सहकार्य नाही
थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या आणि माझ्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांची दत्तनगर कबनूर येथील महिलांनी धुलाई केली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हाही नोंद केला आहे. यानंतर वसुली कर्मचाऱ्यांकडून मला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत गावभाग आणि शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांकडून मात्र कारवाई करणे दूरच, उलट हल्ला झाल्यानंतर पाहू, अशी उत्तरे दिल्याचेही मगदूम यांनी सांगितले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com