झाडांची विविधता जपा, जैवविविधता वाढवा

झाडांची विविधता जपा, जैवविविधता वाढवा

08822
संग्रहित
----------
झाडांची विविधता जपा, जैवविविधता वाढवा
एकसुरी लागवडीमुळे स्थानिक जैवविविधतेला धोक्याची शक्यता
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : पावसाळा सुरू होताच वृक्षारोपणाच्या तयारीला वेग येतो. त्यासाठी दरवर्षी नागरिक, सामाजिक पर्यावरणीय संस्था, प्रशासन तीच तीच झाडे लावतात. अशा एकसुरी लागवडीमुळे स्थानिक जैवविविधततेला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील परिसरात शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष उमराणे यांनी झाडांचा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास केला आहे. त्यानुसार यंदा स्थानिक सदाहरित झाडांचे वृक्षारोपण केल्यास झाडांची विविधता जपत पर्यावरणीय जैवविविधता वाढण्यास मदत होईल.
उष्माघाताने हद्द पार केल्याने मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे मानवाला स्वतःच्या जीवनासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण तातडीचे बनले आहे. यासाठी पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्था, प्रशासन आपापल्या पातळीवर वृक्षारोपणावर भर देते; मात्र अनेक वर्षे वृक्षारोपणातून एकसुरी लागवड पद्धत वाढत आहे. वड, पिंपळ करंज अशा काही मोजक्याच झाडांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अनेक स्थानिक झाडे दुर्मिळ झाली असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यातून झाडांची विविधता जपत पर्यावरणीय जैवविविधता वाढवण्यासाठी डॉ. उमराणे यांनी शिरोळ व हातकणंगले तालुका परिसराचा पर्यावरणीय अभ्यास केला आहे.
एकूण भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, झाडांची विविधता या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला. ऐन उन्हाळ्यात अनेक झाडांची पानझडी होत असून ही परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगला पोषक, फुलपाखरू, पक्षी, कीटक आदी जैवविविधता टिकवून ठेवणारी नाहीशी झालेली झाडे, वृक्षारोपणाच्या नावाखाली सुरू असलेली एकसुरी लागवड आदी बाबी प्रखरपणे समोर आल्या. त्यानंतर डॉ. उमराणे यांनी स्थानिक झाडांची विविधता जपत काही निकष ठरवले. पर्यावरणपूरक स्थानिक झाडे लावताना कमी देखभाल असणारी, जलदगतीने वाढणारी झाडे, दुर्मिळ होत चाललेली झाडे, सदाहरित गर्द सावलीची झाडे, एकसुरी लागवड टाळणे असे निकष लावून काही झाडांची यादी तयार केली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सेवाभावी संस्था यांनी या पावसाळ्यात वृक्षारोपण करताना ही झाडे लावावीत, असे आवाहन ते करत आहेत. जेणेकरून आपल्या गावात वृक्षांची विविधता, वाटसरूंना एप्रिल, मेच्या उन्हाळ्यात गारवा देतील आणि जैवविविधता वाढेल.
------
या झाडांचा समावेश
बहावा, काटेसावर, रिठा, भोकर, जांभूळ, महारुख/महानीम, आंबट चिंच, हादगा, कदंब, आपटा, आवळा, बारतोंडी, वावळ, शिरीष, बकुळ,
पळस, पारिजातक, देशी आंबा, शिवण, ताम्हण, मुचकुंद, पळस, शमी, कवठ, पांगारा, बेल, हिरडा, बेहडा, नांद्रुक, दहीपळस, अर्जुन, सीताअशोक आवळा, पुत्रजीवी.
----
नर्सरीकडे हट्ट करा
सध्या वृक्षारोपणासाठी वाढत्या जागृतीमुळे रोपांना मागणी वाढत आहे. त्यामुळे अनेक खासगी नर्सरीवाले अधिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थानिक नसलेले बरेच वृक्ष माथी मारतात. शासकीय रोपवाटिकेत झाडांची विविधता नसते. त्यामुळे नर्सरीकडे स्थानिक व झाडांच्या विविधतेसाठी मागणी करून हट्ट करावा. तरच ते नक्कीच उपलब्ध करतील. मागणी वाढल्यास किमान पुढील वेळा तरी याबाबत नर्सरीवर दबाव राहील.
-------
वृक्षारोपण करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यातून वाढणारी झाडे स्थानिक विविधता जपणारी आणि जैवविविधता वाढवणारी हवीत. तरच पर्यावरणाचा शाश्‍वत विकास होईल.
-डॉ. संतोष उमराणे, पर्यावरण अभ्यासक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com