

फोटो - संग्रहित
--
दिसले वाहन की बॅटरी गायब..!
वस्त्रनगरीत बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ ; वाहनधारकांत धास्ती, पोलिसांसमोर आव्हान
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ : औद्योगिक नगरीत बॅटरी चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून पोलिसांसह टेम्पो, ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना यामुळे घाम फुटला आहे. ''दिसले वाहन की बॅटरी गायब'' असे चोरट्यांचे गणित झाले आहे. दोन टोळ्यांवर कारवाई करूनही चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शहरात काही ठिकाणे तर बॅटरी चोरीची ‘हॉटस्पॉट’ ठरत असून पोलिस आणि वाहनधारकांच्या डोळ्यात धूळ फेकत चोऱ्या सुरूच आहेत.
इचलकरंजी हे औद्योगिक केंद्र असल्याने शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांवर ट्रान्सपोर्ट, टेम्पो व ट्रक उभे असतात. या वाहनांत बसविलेल्या बॅटऱ्या अत्यंत महागड्या असतात. जुन्या बॅटऱ्यांनाही भंगार बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने चोरटे त्यावर डोळा ठेवून आहेत. विशेषतः ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्ट वाहनांच्या बॅटऱ्या चोरून स्वस्त दरात विक्री करून चोरटे सहज पैसा कमावत असल्याचे समोर येत आहे.
बॅटरीमध्ये शिसे, ॲसिड आणि लिथियम-आयनसारखे मौल्यवान घटक असल्याने भंगार बाजारात त्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे चोरीच्या बॅटऱ्यांना चांगला दर मिळत आहे. परिणामी, शहरात दररोज वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
सुरुवातीला बॅटऱ्यांचे पक्के बिल नसल्यामुळे गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण कमी होते. मात्र टेम्पो व ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन टोळ्यांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.तरीही चोऱ्यांचे सत्र थांबलेले नाही. उलट वाहन सुरक्षित व उजेडाच्या ठिकाणी उभे असतानाही बॅटऱ्या लंपास करण्याचे धाडस चोरट्यांकडून वाढले आहे.
--------
चोरट्यांपुढे उपाय निष्प्रभ
बॅटरी चोऱ्या रोखण्यासाठी वाहनधारकांनी गाडीच्या बोनेटला अतिरिक्त ‘हूड लॉक’, तसेच बॅटरीसाठी मेटल क्लॅम्प व लॉक बसवले तरी चोरट्यांनी त्यालाही सुरुंग लावला आहे. कटरच्या साहाय्याने लॉक व क्लॅम्प कापून बॅटऱ्या चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. डंपर वाहनांच्या काचा फोडून सीटखालील क्लॅम्प कापूनही चोरी केली जात असल्याने चोरट्यांची धाडसी पद्धत समोर आली आहे. सर्व उपाययोजना अपुऱ्या ठरत असून चोरट्यांपुढे सुरक्षा व्यवस्थाच हतबल झाल्याचे चित्र आहे.
--------
बॅटरी चोरीची हॉटस्पॉट
* जुना चंदूर रोड
* वैरण बाजार
* आभार फाटा
* अलायन्स हॉस्पिटल परिसर
* कलानगर रोड
* नाट्यगृह चौक
* खंजिरे औद्योगिक वसाहत
--------
बॅटरी चोरी (पाच महिने)
* गुन्हे - ९
* बॅटऱ्या (चोरी व जप्त ) - ३३
* मुद्देमाल - १ लाख ९२ हजार
--------