
जयसिंगपुरातील ५६५ विक्रेते आत्मनिर्भर
82853
जयसिंगपुरातील ५६५ विक्रेते आत्मनिर्भर
पालिकेचा पुढाकार; छोट्या व्यावसायिकांना लाभ
जयसिंगपूर, ता.२५: पालिकेच्या पुढाकाराने शहरातील ५६५ फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ झाला आहे.
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीची योजना देशभरात राबवली आहे. यात जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला होता. शहरातील फेरीवाले, भाजीपाला, फळविक्रेते यांच्यासह अन्य विक्रेत्यांची नोंदणी ३४३ झाली होती. त्याचबरोबर दुकान व्यावसायिक अशा एकूण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ५६५ फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांना सुक्ष्म पथपुरवठा सुविधा योजनेची अंबलबजावणी १७ जून २०२० मध्ये केली आहे. त्यानुसार शहरातील फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेते, कटलरी, किराणा, मोबाईल, ट्रेनिंग, पान शॉप यासह स्टॉल व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता आला आहे.
नागरिक पथ विक्रेते यांना पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचे विनातारण खेळते भांडवल, कर्ज उपलब्ध मिळेल त्याचबरोबर अत्यंत कमी व्याज दर असल्याने याचे परत फेड दरमहा केल्यास ७ टक्के व्याजाचा लाभ मिळतो. जयसिंगपूर पालिकेने शहरातील ३४३ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सर्वेक्षणासाठी फेरीवाल्यांकडून आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड, बँक पासबुक, कागदपत्रे ऑनलाईन माहिती भरावयाची आहे. त्यानुसार जयसिंगपूर शहरातील फेरीवाले व दुकान व्यावसायिकांनी लाभ घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात १० हजार रक्कम ४०३ जणांना मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये १५० जणांना तर तिसऱ्या टप्प्यातील ५० हजार रुपये १२ जणांनी अशा एकूण ५६५ जणांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, उपमुख्याधिकारी प्रफुल्लकुमार वनखंडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शुभांगी देशमुख, समुदाय संघटक मेघा खामकर आदींचे सहकार्य लाभले आहे.
....
शहरातील जास्तीत जास्त छोट्या आणि पात्र व्यावसायिकांना प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनानंतर आर्थिक झळ बसलेल्या व्यावसायिकांना याचा आधार झाला आहे.
-तैमूर मुल्लाणी, मुख्याधिकारी तथा प्रशासक जयसिंगपूर पालिका