
उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड बंदला प्रतिसाद
05085
उदगांव : आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
...
उदगांव, शिरटीसह चिंचवाड बंदला प्रतिसाद
शिरोळ येथील आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणाचा निषेध
जयसिंगपूर, ता.२०: शिरोळ येथील आक्षेपार्ह स्टेटस घटनेप्रकरणी उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड येथे सोमवारी (ता.२०) बंद पाळण्यात आला. शिरोळ शहरात झालेल्या घटनेमुळे शिरोळ शहर बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर उमळवाड, उदगांव, शिरटी, घालवाड, मौजे आगर, चिंचवाड येथे शिरोळ येथील घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवले.
उदगांव येथील मुख्य बाजारपेठ, शिरोळ रोड, सांगली-जयसिंगपूर महामार्गावर सर्व दुकाने, व्यवसाय, व्यापार बंद ठेवण्यात आला. याला छत्रपती शाहू महाराज अॅटो रिक्षा युनियन यांनी रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विनोद पाटोळे, शामराव कोरे, दिलीप माने, युवराज वरेकर, राजू घाटगे, अशोक वरेकर, प्रकाश गडकरी, शरद लुघडे, संभाजी शिंदे, शिवाजी गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तक्रारदारावर हल्ला करणाऱ्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करुन उदगांव येथील बंदला समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने लेखीपत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी शहीनशहा जमादार, सलीम नदाफ, तोसिफ जमादार, अल्लाहुद्दीन नदाफ, हैदर सय्यद, बबलू पेंढारी, फिरोज जमादार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी उदगांव-जयसिंगपूर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.