उन्हाळ्यात धुरळा, पावसाळ्यात चिखल

उन्हाळ्यात धुरळा, पावसाळ्यात चिखल

लोगो ः ग्राउंड रिपोर्ट
-------------------
5283
जयसिंगपूर : पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना एसटीच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. (छायाचित्र ः राहुल मोरे)
05282
जयसिंगपूर : मद्यपी व भिकाऱ्यांच्या निवासामुळे बसस्थानक की, विश्रांतीगृह असा प्रश्न पडतो.
05281
जयसिंगपूर : बसस्थानकाच्या आवारात अवैध पार्किंग केले जात आहे.
-------------
उन्हाळ्यात धुरळा, पावसाळ्यात चिखल
जयसिंगपूर बसस्थानकात समस्यांची गर्दी; चौदाशे गाड्यांची वर्दळ

जयसिंगपूर बसस्थानकावर सध्या समस्यांचीच गर्दी वाढली आहे. काही वर्षांत बसस्थानकाचे महत्त्व ओळखून यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होत गेला असला तरी त्या तुलनेत समस्यांचा मात्र निपटारा होऊ शकलेला नाही. उन्हाळ्यात धुरळा आणि पावसाळ्यात चिखल अशी अवस्था असणाऱ्या या बसस्थानकाची समस्याच्या गर्तेतून मुक्तता करून प्रवाशांसाठी सोयीचे कधी बनणार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.
-गणेश शिंदे.
-----------------
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून जयसिंगपूर बसस्थानकाची ओळख आहे. कोरोनातून बाहेर पडलेल्या एसटी महामंडळाच्या वाहतुकीची आता घडी बसली आहे, तर दुसरीकडे जयसिंगपूर बसस्थानकात फक्त तीन फलाट असल्याने हे बसस्थानक अपुरे पडत आहे. त्यामुळे बसस्थानकात येत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी जागाच नसल्याने हजारो प्रवाशांना तास-तासभर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे लोकप्रतिनिधी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जयसिंगपूर बसस्थानकातील प्रवाशांना पुरेसे बसस्थानक उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कुरुंदवाड आगाराअंतर्गत शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी अशी चार बसस्थानके कार्यरत आहेत. यात सर्वाधिक उत्पन्न देणारे व गर्दीचे बसस्थानक जयसिंगपूर आहे. येथून दरारोज बाराशे ते चौदाशे एसटी बसेसच्या फेऱ्या होतात. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या जयसिंगपूर येथून सोडण्यात येतात. येथील बसस्थानक खराब झाल्याने तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी एक कोटी निधीतून नव्या बसस्थानकाची उभारणी केली आहे.
यात तीन फलाट, वाहतूक नियंत्रक कक्ष, पास व बुकींग विभाग, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष उभारले आहे. दररोज बाराशे ते चौदाशे एसटी बसेस येत असताना तीन फलाट अपुरे पडत आहेत. एसटी लावण्यासाठी जागाही उपलब्ध होत नसल्याने बसस्थानकात कुठेही एसटी उभ्या राहत आहेत, तर दुसरीकडे प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हजारो प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. यात वृद्ध मंडळी व शालेय मुला-मुलींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांतून नाराजीचा सुर उमटत आहे.
....

गैरसोयी दृष्टिक्षेपात
* स्वच्छतेचा अभाव
* चोरीच्या घटनावर अंकुश नाही
* पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था
* मुली, महिलांच्या छेडछाडीच्या घटना
* अस्वच्छ स्वच्छतागृह
* पोलिस नियंत्रण कक्षाची आवश्यकता
....

निधी आला; कामाची प्रतीक्षा
आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी एक वर्षापूर्वी तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांना जयसिंगपूर बसस्थानक अपुरे पडत असून बसस्थानक विस्तारण्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर मंत्री परब यांनी २ कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर हे २ कोटी रुपये महामंडळाला मिळाले. टेंडर प्रक्रिया सुरू असून आता प्रत्यक्ष कामाची प्रतीक्षा लागली आहे.
....

वाढत्या चोऱ्यांचे आव्हान
बसस्थानकावर चोऱ्यांच्या प्रमाणात विलक्षण वाढ झाली आहे. यावर मात करण्यासाठी आगाराने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवली आहे. अशा स्थितीतही चोरीचे प्रमाण वाढत असल्याने ते रोखणे आव्हान बनले आहे.
....

जयसिंगपूर बसस्थानकाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. दोन कोटींच्या निधीतून लवकरच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिवाय कुरुंदवाड आगाराच्या प्रवासी सेवेत नव्याने दहा नव्या गाड्या सामील होतील. जादाचे चालक, वाहकदेखील लवकरच सेवेत रुजू होणार आहेत.
-राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार.
....

जयसिंगपूर बसस्थानकावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात धुरळा आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात.

-आनंद लटके, नोकरदार प्रवासी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com