उपक्रमात व्यस्त, गुणवत्तेचा होतोय अस्त

उपक्रमात व्यस्त, गुणवत्तेचा होतोय अस्त

Published on

उपक्रमात व्यस्त, गुणवत्तेचा होतोय अस्त
शिक्षक द्विधा मनस्थितीत ः गुणवत्तापूर्ण शिक्षण वाऱ्यावर

जयसिंगपूर, ता.१८: शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, बीएलओ, नवभारत साक्षरता अभियान यासह विविध उपक्रमात शिक्षकांना गुंतवण्यात आल्याने याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या शासकीय पातळीवर उपक्रमांनाच महत्त्व देत ते सक्तीने राबवले जात असताना शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेबद्दल आग्रह धरला जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
दरवर्षीप्रमाणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाची विशेष मोहीम सुरू आहे. दोन वर्षात शाळाबाह्य विद्यार्थी आढळण्याचे प्रमाण निरंक असताना यावर्षी पुन्हा ही सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. वास्तविक सध्या उसाचा हंगाम नसल्याने शिवाय पावसाळ्यामुळे वीटभट्या बंद असल्याने या सर्वेक्षण मोहिमेचा फारसा फायदा होणार नाही तरीही शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त आहेत.
याबरोबरच नवभारत साक्षरता अभियान, मेरी माटी मेरा देश अभियान, निवडणूक विभागाकडे काम करणाऱ्या बीएलओ शिक्षकांवर शासनाने अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. अशा कामावर शासनाचे बारकाईने लक्ष आहे. यात थोडीशीही कुचराई झाल्यास शिक्षकांना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला जातो.
शासनाच्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे की विद्यार्थ्यांना शिकवून या उपक्रमांसाठी काम करायचे अशी द्विधा मनस्थिती शिक्षकांची झाली आहे. कोरोनानंतर आता शिक्षण पूर्वपदावर येत असतानाच विविध उपक्रमांमुळे शिक्षकांच्या मानसिकतेवर याचे परिणाम जाणवत आहेत. अशा अवस्थेत त्यांच्याकडून गुणवत्तेची मागणी करायची कशी? दुसऱ्या बाजूला शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर कसरत करण्याची वेळ आली आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये शाळा स्तरावर शिक्षक मदतनीस नेमून त्यांना मानधन देतात. एका जयसिंगपूर शहरात नगरपालिकांच्या शाळांमध्ये वीस शिक्षक अपुरे आहेत. यावरून जिल्ह्याची अवस्था लक्षात येते. खासगी शाळांमध्ये शाळा स्तरावर मदतनीसांची नेमणूक केली जाते. शासन शिक्षक भरतीची आश्वासने देत असताना त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नाही. जिल्हा परिषद शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना मानधन स्वरूपात नेमणूक करून त्यांची मदत घेतली जात असताना नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या अपुऱ्या शिक्षकांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही.
....
बेरोजगार तरुणांच्या माध्यमातून शासनाने विविध उपक्रम राबवले पाहिजेत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळाला तरच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनाने आग्रह धरला पाहिजे. आज शिक्षकांचा बहुतांश वेळ विविध उपक्रमावर खर्च होतो. अशा स्थितीतही शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राबत आहेत. मात्र शासनाने त्यांचीही मानसिकता लक्षात घेण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण काळाची गरज असून यातूनच समृद्ध राष्ट्र निर्मिती होऊ शकते.

-दादासाहेब लाड, शिक्षक नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com