शेतीला भेगा; विहिरींनी गाठला तळ

शेतीला भेगा; विहिरींनी गाठला तळ

06096
जयसिंगपूर : पावसाअभावी शेतजमीन भेगाळली आहे.
------------------
शेतीला भेगा; विहिरींनी गाठला तळ
पीके धोक्यात ः पावसाच्या विश्रांतीचा परिणाम; शेतकरी चिंतातूर

जयसिंगपूर, ता.२१: पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्याने शेत जमिनींना भेगा पडल्या असून विहिरींनीही तळ गाठल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जुलैच्या सुरुवातीला जोरदार पाऊस आणि पाण्याच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन पुराच्या भीतीने शेतकऱ्यांनी नदीवरील मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. त्यामुळे आता जोरदार पाऊसच पिकांना वाचवून शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो.
महिनाभर पाऊस लांबला. धरणांमध्ये पिण्यासाठी पाणी राखून ठेवल्याने शेतीचा पाणी उपशावर मर्यादा आल्या. याकाळात शिरोळ तालुक्यातील माळरानावरील हिरवीगार पिके करपून गेली. ऊस पिकाची वाढ खुंटली. पाऊस सुरू झाला. पूर परिस्थिती निर्माण झाली. अशा काळात शेतकऱ्यांनी नदीकाठच्या मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवत नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाऊस आणि पुराने हुलकावणी दिल्यानंतर आता उरलीसुरली पिकेही पाण्याअभावी धोक्यात आली आहेत.
सध्या तालुक्यातील प्रमुख पीक असणाऱ्या उसाबरोबर माळभागातील पिकांना पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे. शिरोळ तालुक्यात तीन आठवड्यांपासून जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतजमिन भेगाळली आहे. दुसऱ्या बाजूला कुपनलिकांचे पाणी कमी झाले असून विहिरींनीही अद्याप तळ सोडलेला नाही. दरवर्षी ऑगस्टच्या मध्यापर्यंत विहिरी काठोकाठ भरून वाहत असतात. यावर्षी मात्र ही स्थिती दिसत नाही. तालुक्यातील बहुतांश विहिरी अद्याप तळात आहेत. शिवाय आणखी महिनाभर पावसाचा हंगाम बाकी असल्याने जोरदार पाऊस झाला नाही तर मात्र सर्वच पिके धोक्यात येणार आहेत. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. काही वर्षातील अनुभव लक्षात घेता पिके काढणीच्या वेळीच जोरदार पाऊस होऊन पिकांचे नुकसान होते. मात्र यावर्षी पिकांची वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पुराची भीती बाळगत ऊस बियाणांसाठी विकला आहे. काही शेतकऱ्यांनी पुराच्या भितीने ऊस चाऱ्यासाठी विक्री केला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला तरच पिकांचे नुकसान टळणार आहे.
....
कारखान्यांची होणार कसरत
दिवाळीनंतर उसाचा हंगाम सुरू होतो. पावसाळ्यात ऊसाची वाढ जोमदार होते. यामुळे कारखान्याच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते. यावर्षी पाऊस नाही, ऊस पिकाची वाढ नाही. पूरग्रस्त गावातील ऊस बियाणे आणि चाऱ्यासाठी तोडल्याने पूर्ण क्षमतेने गाळप करताना कारखानदारांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे. अशा स्थितीत कर्नाटकातील उसावर महाराष्ट्रातील कारखान्यांचा डोळा असणार आहे.
....
पिके धोक्याच्या वळणावर
तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने तालुक्यातील उसाबरोबर अन्य पिकांची वाढ खुंटली आहे. आठवडाभरात मुबलक प्रमाणात पाऊस झाला नाही तर अनेक भागातील पिके नष्ट होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com