नद्या तळाला; मगरी काठाला

नद्या तळाला; मगरी काठाला

नद्या तळाला; मगरी काठाला
शिरोळ तालुक्यातील चित्र; शेतकऱ्यांमध्ये भीती
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : तीव्र उन्हामुळे शिरोळ तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. उन्हाळ्याच्या हंगामात तालुक्यातील नद्या तीन-चार वेळा कोरड्या पडल्या. परिणामी, नदीकाठावर सातत्याने मगरींचे दर्शन घडू लागले आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कडक उन्हामुळे शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. मगरींची संख्या वाढली असल्याने नदीपात्रात व काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे.
शिरोळ तालुक्यातील नदीकाठ मगरमिठीत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने नदीकाठावरील गावात जागरूकता करण्याची गरज असून, शेतकऱ्‍यांनी व पोहायला जाणाऱ्‍यांनी सुरक्षा बाळगण्याची गरज आहे. शिरोळ तालुक्यात सातत्याने येत असलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील बेटे व अन्य झाडांची झुडपे नष्ट झाल्याने मगरींचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा या चार नद्यांच्या काठांवरील मळीची माती वीट भट्टीसाठी उत्खनन केल्याने नदीकाठ भयाण झाला आहे. शिरोळ तालुक्यात मगरीच्या हल्‍ल्यात अनेकांचे बळी गेले आहेत.
सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा असल्याने कृष्णा नदीकाठावरील कोथळी, उदगांव, उमळवाड, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, घालवाड, गणेशवाडी, नृसिंहवाडी, आलास, कवठेगुलंद, वारणा नदीकाठावरील दानोळी, कवठेसार तर पंचगंगा काठावरील शिरढोण, टाकवडे, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड या भागात तर दुधगंगा काठावरील सलदगा, दत्तवाड, घोसरवाड, दानवाड या भागात मगरीचे दर्शन होत असल्याने नदीत व नदीकाठावर मगरीचा वावर वाढला आहे. शेतकऱ्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी नदीकाठ व नदीत जाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
....

उपाययोजना आवश्‍यक
* नदीकाठावरील गावांनी आपल्या गावचे पाणवठे किंवा घाटाजवळ मगरीच्या सूचनेचे फलक लावणे.
* शेतकऱ्‍यांनी नदीकाठावर गेल्यानंतर परिसरात दक्ष राहून शेतात पाहणी करावी.
* एखाद्या ठिकाणी मगर शेतात किंवा काठावर दिसून आल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्‍यांना कळवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com