डेंगीचे रुग्णांची पालिकेकडे नोंदच नाही

डेंगीचे रुग्णांची पालिकेकडे नोंदच नाही

Published on

डेंगीचे रुग्णांची पालिकेकडे नोंदच नाही
उपाययोजनेत अडचणी : पालिका-डॉक्टरांमध्ये समन्वयाचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ५ : शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, शहरात डेंगीच्या रुग्णांची नेमकी संख्या किती, याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागालाच नाही. शहरातील डॉक्टरांना पालिकेला आपल्याकडील रुग्णांची माहिती दिलेली नाही. पालिका आणि डॉक्टरांमध्ये समन्वय नसल्याने नेमकी रुग्ण संख्याच उपलब्ध नाही.
रुग्णांची संख्या किती, शहराच्या कोणत्या भागात अधिक प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत, याची माहिती उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासनाला उपाययोजना करणे कठीण बनले आहे. पालिका प्रशासनानेही शहरातील दवाखान्यांना लेखी स्वरूपात कळवून डेंगी रुग्णांची माहिती घेणे गरजेचे होते. डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसला तरी पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत दररोजची माहिती घेणे अपेक्षित होते.
शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याची डबकी आणि तुंबलेल्या गटारीमधून डासांच्या फौजा तयार होत आहेत. पालिकेकडून साधी औषध फवारणीही केली नसल्याने दिवसेंदिवस डासांच्या उत्पतीत वाढ होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाला डेंगीचे गांभीर्य नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच अतिरिक्त जबाबदारी म्हणून शहरातील डॉक्टरांशी समन्वय ठेवून रुग्णांची माहिती घेऊन त्या भागात सर्वेक्षण करत उपाययोजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे.
....
औषध फवारणीसाठी तरतूदच नाही
शहरात सातत्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असताना पालिका प्रशासनाने धूर फवारणीसाठी विशेष अशी तरतूद केली नाही. त्यामुळे औषध फवारणीत सातत्य नसते. ही बाब डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे.
....
ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार
शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सध्या शहरातील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. आरोग्य केंद्राने रुग्णांची माहिती घेऊन त्या त्या गावच्या ग्रामपंचायतीला रुग्णांची माहिती दिल्यास ग्रामीण भागातही डेंगीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.
....
घरातच डासांची उत्पत्ती
यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात केलेल्या सर्वेक्षणात घरातील फ्रिजमधील ट्रेमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या होत्या. शिवाय घराजवळ असलेल्या पाणीसाठ्यातही डासांच्या अळ्या सापडल्याने घरातच उत्पत्ती होत असेल तर करायचे काय, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
....

शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्ण सापडत असताना पालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. शहरात रुग्ण किती, याची साधी माहिती नसताना उपाययोजना काय करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता उपाययोजनांची ठोस कृती करावी. आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास पालिकेविरोधात तीव्र आंदोलन करू.

-चंद्रकांत जाधव-घुणकीकर,
माजी नगरसेवक जयसिंगपूर
....
शहरातील डॉक्टरांशी समन्वय ठेवून डेंगी रुग्णांची माहिती घेऊन त्या भागातील सर्वे आणि उपाययोजना राबवल्या जातील. डॉक्टरांनीदेखील उपचार होणाऱ्या रुग्णांची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागासह प्राथमिक आरोग्य केंद्राला देऊन सहकार्य करावे.

-डॉ. पांडुरंग खटावकर,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.