माळरानावरील उसाला हुमणीचा विळखा

माळरानावरील उसाला हुमणीचा विळखा
Published on

14564
जयसिंगपूर : हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शिरोळ तालुक्यातील ऊस पीक धोक्यात आले आहे. (छायाचित्र : संदीप खामकर, जयसिंगपूर)

माळरानावरील उसाला हुमणीचा विळखा
शिरोळ तालुक्यात शेकडो एकरावर प्रादुर्भाव; भुईमूग, उडीद पिकालाही फटका, शेतकरी चिंतेत
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १९ : अनियमित पाऊस, ढगाळ वातावरणामुळे शिरोळ तालुक्यातील माळरानावरील ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. तालुक्यातील शेकडो एकर जमीन हुमणीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून, हुमणीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे.
मादी हुमणीकडून जमिनीत दोन ते अडीच हजार अंडी घातली जातात. चोवीस तासांत अंड्यांमधून हुमणीच्या अळ्या बाहेर पडतात. याच अळ्या सध्या उसाच्या पांढऱ्या मुळांना लक्ष्य करत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर एक-दोन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे हुमणीचा काही प्रमाणात नायनाट झाला. मात्र, माळरानावरील हुमणीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मॉन्सूनपूर्व पावसानंतर शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली. याच काळात हुमणीने भुसभुशीत जमिनीत मोठ्या प्रमाणात अळ्या घातल्या होत्या. ऊस लागण केल्यानंतर उसाच्या पांढऱ्या मुळांचे खाद्य बनले आहे. उसाबरोबरच भुईमूग, उडीद, ही पिकेही हुमणीकडून लक्ष्य केली जात आहेत. यंदा शिरोळ तालुक्यात पावसाने दिलेली हुलकावणी, निर्माण झालेली उष्णता यामुळे हुमणीच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नवीन उसाच्या रोपांची कोवळी पांढरी मुळे कुरतडली जात आहेत. मुळाशीच हुमणी लागत असल्याने वरून केलेल्या फवारणीचा उपयोग होत नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळवणीचा खर्च मोठा असल्याने शेतकऱ्यांकडून याला प्रतिसाद मिळत नाही. बऱ्याचदा हुमणी रानभर पसरल्यानंतर प्रादुर्भावाचा अंदाज येतो. यामुळे उपाय करण्याला उशीर होतो. अशा स्थितीत जोरदार पावसाची प्रतीक्षा हाच एकमेव उपाय शेतकऱ्यांना दिसत आहे.
--------------
चौकट
कोट्यवधी रुपयांचा फटका
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. हुमणीमुळे शेकडो हेक्टर ऊस धोक्यात आला आहे. परिणामी, उत्पादन घटून शेतकरी कारखानदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------
जोरदार पावसाची प्रतीक्षा
हुमणीवर नियंत्रणासाठी सध्या जोरदार पाऊस हाच एकमेव उपाय शेतकऱ्यांना दिसत आहे. जोरदार पावसानंतर शेतात पाणी साचून राहिले, तरच हुमणीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.
------------------
कोट
जोरदार पाऊस किंवा आळवणी हे दोनच उपाय हुमणी नियंत्रित करू शकतात. आळवणी खर्चिक आहे. बऱ्याचदा हुमणीचा प्रादुर्भाव अंतिम टप्प्यात लक्षात येतो. त्यामुळे जोरदार पाऊस झाला, तरच हुमणीवर नियंत्रण येणार आहे.
- संजय सुतार, उपकृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com