‘कागल पंचतारांकीत’ला कचऱ्याचा विळखा

‘कागल पंचतारांकीत’ला कचऱ्याचा विळखा

01514, 01515
कागल एमआयडीसी परिसरात उघड्यावर टाकलेले चिकनचे तुकडे खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांची उडालेली झुंबड. दुसऱ्या छायाचित्रात रेमंड चौक परिसरातील कचरा (छायाचित्र : संतोष माळी)
.............

‘कागल पंचतारांकीत’ला कचऱ्याचा विळखा

कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिकांत दहशत ः कचरा टाकणाऱ्यांवर संयुक्त कारवाईची गरज

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. १२ ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. रिकामे भूखंड, बांधकाम न केलेल्या शिल्लक जागा कचरा टाकण्यासाठी वापरल्या जात आहेत. चिकन, मटणाचे तुकडे, कोंबडीची पिसे, खराब अन्न, प्लास्टिक कागद, पोती, फाउंड्रीमधील काळी राख यांसह मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर टाकला जात आहे. मांसाच्या तुकड्यांमुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. परिणामी कामगार आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तेथून जाताना जीव मुठी घेऊन जावे लागत आहे. ग्रामपंचायत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कागल एमआयडीसीमध्ये कागल, हातकणंगले, करवीर तालुक्यांतील अनेक गावांचा समावेश आहे. सुमारे दोन हजार हेक्टरवर एमआयडीसीची उभारणी झाली आहे. येथे आठशे उद्योगधंदे सुरू आहेत. हातगाड्या, नाष्टा सेंटर, हॉटेल, भाजीपाला, फळे आणि चिकन-मटण मासे विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. फाउंड्री व्यवसायही सुरू आहेत. परिसरात अनेक ठिकाणी रिकामे भूखंड शिल्लक आहेत. त्याचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात आहे.
एमआयडीसीमध्ये बहुतांशी कामगार परप्रांतीय आहेत. मांसाहार करण्याकडे त्यांचा कल अधिक असतो. त्यामुळे रेमंड चौक परिसरात अनेक विक्रेते चिकन-मटण आणि मासे विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, शिल्लक मांस आणि चिकन, पिसे याची योग्य विल्हेवाट न लावता दिसेल त्या रिकाम्या जागेत उघड्यावर टाकले जाते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे .भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कुत्री हिंसक बनून कामगार आणि गाड्यांच्या पाठीमागे धावत असतात. सुटी झाल्यानंतर चालत जाणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेमंड चौक, मेट्रो हायटेक पार्कच्या पाठीमागील बाजूस कचऱ्याचे मोठे ढीग पडले आहेत.
................
चौकट...
व्यवसाय एकाचा, त्रास दुसऱ्यांना
परिसरात अनेक हातगाड्या आहेत. याठिकाणी वडा-पाव, भजी, चायनीज पदार्थ, आइस्क्रीम, चिकन-मटण-माशांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र शिल्लक कचरा, खराब पदार्थ, पिसे, मांसाहाराचे तुकडे यासह वेगवेगळा कचरा उघड्यावर टाकला जातो. यामुळे व्यवसाय एकाचा आणि त्रास दुसऱ्यांना अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
....
घंटा गाडीचा पर्याय हिताचा
परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे संकलन महत्त्वाचे आहे. यासाठी काही ठिकाणे, चौक निश्चित करून कचरा कुंड्या ठेवणे गरजेचे आहे. जमलेला कचरा घंटागाडीतून कचरा प्रकल्पाकडे पाठविल्यास उघड्यावर पडणारा कचरा कमी होईल. यासाठी घंटागाडी हा पर्याय हिताचा असेल. यासाठी व्यापाऱ्यांना शिस्त लावण्याचे मोठे काम एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना करावे लागेल.
....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com