
दूध उत्पादकांना लिटरला २० पैसे नाहीच
लिटरला २० पैसे दरवाढ नाहीच
बल्क कुलर योजना; दूध उत्पादकांचा तोटा, गोकुळने लक्ष देण्याची मागणी
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. २३ : ‘गोकुळ’च्या दूध संस्थांमधील बल्क कुलरमध्ये दूध घातल्यानंतर थेट दूध उत्पादकाला २० पैसे दरवाढ मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोकुळ संघाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी दूध उत्पादकांच्यातून होत आहे.
‘गोकुळ’तर्फे जिल्ह्यात ५७ संस्थांच्या ठिकाणी बल्क कुलर बसविले आहेत. दूध उत्पादकाने किटलीने दूध घालावे व त्यांना जादा पैसे मिळावे हा उद्देश संघाचा होता. मात्र या उद्देशाचा संघाला विसर पडला आहे. कुलरमध्ये साडेतीन लाख लिटर दूध संकलित होते. दूध उत्पादकांना लिटरला वीस पैसे देण्याची सक्ती संघाने संस्थांना करावी, अशी मागणी असून हजारो रुपये दररोजचा दूध उत्पादकांचा तोटा कुलर असूनही होत आहे.
काही संस्था सोयीने कॅनमधून दूध आणून बल्क कुलरमध्ये घालतात. कॅनमध्ये दूध घेतलेल्या ठिकाणी घट आणि वाढ येते. किटलीने थेट बल्क कुलरमध्ये दूध घातल्यामुळे थेट उत्पादकाचे वाढ व घट असे नुकसान होत नाही. याचा विचार कोण करणार, असा प्रश्न उत्पादक करत आहेत.
कुडित्रेतील श्रीकृष्ण व व्यंकटेश्वरा दूध संस्थेत कुलरमध्ये महिन्याला तीस हजार लिटर दूध संकलित होते. या दोन संस्थेत प्रत्येक दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या रोजच्या पावतीमध्ये प्रतिलिटर वीस पैसे प्रिंट स्वरूपात दिले जाते. मात्र ‘गोकुळ’कडून दीड महिन्यातून एकदा बल्क कुलर सेवा म्हणून संस्थांना पैसे दिले जातात. येथील दोन दूध संस्था दहा दिवसाला हा सेवा नफा फरक दूध उत्पादकांना वितरित करतात. बल्क कुलरचे संघाकडून मिळालेले पैसे, काही दूध संस्था व्यवस्थापन खर्चासाठी ठेवून घेतात. यामुळे बल्क कुलरमध्ये दूध घातल्यानंतर शेतकऱ्याला फायदा कसा, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात कुडित्रे, चुये, वडकशिवाले या चार ठिकाणीच किटलीने दूध घेतात.
कोट
कुडित्रेतील दोन दूध संस्थांना एक लाखाचा नफा ‘गोकुळ’कडून मिळतो. तो डायरेक्ट थेट दूध उत्पादक शेतकऱ्याला संस्थेकडून देण्यात येतो. बल्क कुलरमध्ये थेट किटलीने दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांना २ रुपये दर वाढ व्हावी. दोन लाख लिटर दूध झाल्यानंतर दरवाढ देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे.
- विष्णू राऊत, दूध संस्था सचिव,
कोट
बल्क कुलरमधून दूध उत्पादकांना जादा पैसे मिळावे हा उद्देश होता. संस्था मात्र किटलीने दूध घेत नाहीत, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
- विश्वास पाटील, गोकुळ अध्यक्ष