आरोप सिध्द झाल्यास
आमदार पदाचा राजीनामा

आरोप सिध्द झाल्यास आमदार पदाचा राजीनामा

मुश्रीफ यांचा फोटो
०००००००००
आरोप सिद्ध झाल्यास
आमदार पदाचा राजीनामा
मुश्रीफ; सोमय्यांचे आरोप खोटे, षड्‌यंत्राचा भाग
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ९ : किरीट सोमय्या यांनी पुन्हा माझ्यावर खोटे, बेताल व समाजात गैरसमज निर्माण करणारे आरोप केले आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. या आरोपांमधील एक जरी सिद्ध झाला, तर मी आमदार पदाचा राजीनामा देईन. माझी बदनामी करण्यासाठीच हे षड्‌यंत्र आहे. काही दिवसांत याच्या मागील बोलवते धनी असणाऱ्यांना आम्ही उघड करू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिला.
मुश्रीफ म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही तारणावर कर्ज घेतले. शेतकऱ्यांच्या पैशावर नातेवाइकांना कर्ज दिले, यासह अनेक आरोप त्यांनी केले आहेत. ते सर्व खोटे आहेत. कारखान्याच्या शेअर्ससाठी आम्ही आवाहन केल्यानंतर कमी दिवसांत इतके पैसे जमू शकतात, हे आगळं आणि वेगळं उदाहरण आहे. आम्ही या शेअर्सपोटी शेतकऱ्यांना दर महिन्याला पाच किलो साखर, खते, बी - बियाणे सवलतीच्या दरात देतो. तसेच त्यांचा ऊस अग्रक्रमाने नेतो. सोमय्यांना माझी लोकप्रियताच बघायची असेल, तर मी आवाहन केल्यानंतर शंभर कोटी रुपये जमू शकतात, इतका विश्वास लोकांचा माझ्यावर आहे. मी आयुष्यभर लोकांची सेवा केली आहे. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे आणि परमेश्वराच्या कृपेने कुठलेही संकटाला पार करू.’’
मुश्रीफ म्हणाले, ‘‘सोमय्या यांनी आरोप तेव्हापासून मी सांगत होतो की याची माहिती तुम्हाला नाही. कारखानदारीत शेतकऱ्यांचे शेअर्सचे दहा हजार रुपये जमा करून व उर्वरित राष्ट्रीयीकृत पाच बँकांची कर्जे घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आपल्या तीन मुलांनी उभा केला आहे. यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. चाळीस हजार शेतकऱ्यांच्या नावावर दहा हजार प्रमाणे जे शेअर्स घेतलेले आहेत, ते २०१० - ११, २०११ - १२ व २०१२ - १३ या तीन वर्षांत कारखान्यासाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची गरज काय? शासनाचे कोणतेही अनुदान खासगी साखर कारखान्याला मिळत नाही, याची सुद्धा त्यांना माहिती नसावी, याचे मला आश्चर्य वाटते.’’
ते म्हणाले, ‘‘माझ्यावर व्यक्तिगत कितीही आरोप करू देत; पण जिल्हा बँक जी आम्ही रक्त आटवून उभी केली आहे, राज्यात या बँकेचा गौरव आहे, त्या बँकेला बदनाम करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत. मी, एक पैचेही कर्ज घेतलेले नाही. कोणत्या नातेवाइकांनाही दिलेले नाही. कारखान्याला बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही. आमदार विनय कोरे, तसेच शिंदे गट व भाजपला मानणारे जे संचालक आहेत यांना मी त्यांच्याकडे पाठवणार आहे. आमचे युनियनचे पदाधिकारीही त्यांना भेटणार आहेत. ते, सोमय्या यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतील.’’

छाप्यांचा विक्रमच होईल!
जिल्हा बँकेची बदनामी आम्ही कदापी सहन करणार नाही. मी, माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर प्राप्तिकर, आरओसी त्यानंतर ईडी आणि पुन्हा ईडी असे सातत्याने छापे घातले जात आहेत. छापे टाकण्याचा हा जागतिक विक्रम होईल, असा टोलाही श्री. मुश्रीफ यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com