टॉवर हाय; पण पॉवर न्हाय

टॉवर हाय; पण पॉवर न्हाय

टॉवर हाय; पण पॉवर न्हाय

सांगाव माळ परिसरातील उपनगरांत मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १४ : सध्याच्या काळात संभाषणाचे, व्यवसायाचे व व्यवहाराचे मुख्य माध्यम मोबाईल झाल्याने त्यासाठी चांगले नेटवर्क महत्त्वाचे आहे; पण येथील सांगाव माळ परिसरातील काही उपनगरांत मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहे. त्यामुले रेंज मिळत नसल्याची मोबाईलधारकांची तक्रार असून, मोबाईल कंपन्या लक्ष देत नसल्याने तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
येथील सांगाव माळ परिसरात दत्त कॉलनी, यशवंत कॉलनी, मल्हारनगर, शिवाजीनगर, गणेशनगर, कमल अनंतनगर या उपनगरांत मोबाईल रेंज नसल्यामुळे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहे. याचा त्रास या परिसरात शाळा महाविद्यालयांसह नागरिकांना होत असून, ''टॉवर हाय, पण पॉवर न्हाय'' अशी तेथील अवस्था झाली आहे.
मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक घरात किमान दोन-तीन मोबाईल आहेत. स्मार्टफोनमुळे जगात कुठेही घडलेली माहिती एका ''क्लिक''वर घरी बसल्या मिळते. असे असताना या परिसरात नेटवर्क विस्कळीत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. संपर्कात किंवा कामात अडचण निर्माण झाली आहे. सध्या इंटरनेटवर सर्व बँकिंग व्यवहार चालतात. सर्व प्रकारची कागदपत्रे, दाखले, उतारे, इंटरनेटवरून मिळतात. बँकिंग व्यवहारसुद्धा अनेक जण ''गुगल पे'', ''फोन पे''वरून करतात. या परिसरात मोबाईल कंपन्यांचा मारलेला रिचार्ज वाया जात आहे. सोयीसुविधांच्या अपेक्षेणे शहरात येऊन राहिलेल्यांची यामुळे कुचंबणा होत आहे. संबंधितांनी लक्ष घालून ग्राहकांची कुचंबणा थांबवावी. परिसरातील नेटवर्क व्यवस्थित करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोट...
आमच्या परिसरात सात शाळा, महाविद्यालये तसेच वसतिगृहे आहेत. एमआयडीसीच्या जवळचा हा भाग आहे. तसेच आधुनिक प्लॉटिंग रचनेमुळे येथे डॉक्टर, वकील, शिक्षक, शासकीय अधिकारी आदी सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात राहतात; पण रेंज नसल्यामुळे त्यांची ऑनलाईन कामे ठप्प झाली आहेत. रेंज नाही म्हटले तर कोणी विश्वास ठेवत नाही. फोन आलाच तर बोलण्यासाठी घरातून बाहेर जावे लागते. यावर कहर म्हणजे येथे कधी कधी कर्नाटकची रेंज येते, पण महाराष्ट्राची नाही.
- एकनाथ तोडकर
शिक्षक, दत्त कॉलनी, कागल
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com