कागल : कागल विधानसभा वार्तापत्र

कागल : कागल विधानसभा वार्तापत्र

कागल
नरेंद्र बोते

नकारात्मक मताचा कॉंग्रेसला लाभ
कागल :या मतदारसंघात कागल तालुक्यासह गडहिंग्लज शहर, कडगाव व उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ येतो. मंडलिक गटासह शिवसेना (एकनाथ शिंदे गट), पालकमंत्री हसन मुश्रीफ गटासह राष्ट्रवादी (अजित पवार गट) व समरजितसिंह घाटगे गटासह भाजप असे प्रमुख गट संजय मंडलिक यांच्याबरोबर असतानाही लोकांची मते मात्र शाहू महाराजांना मिळाली. यातून मंडलिकांच्या नकारात्मक मताचा लाभ शाहू महाराजांना झाल्याचे चित्र आहे.

मतदारसंघातील स्थानिक उमेदवार असलेल्या प्रा. संजय मंडलिक यांच्या मताधिक्यावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, मंडलिक यांच्या गतवेळच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व नगन्य असतानाही मिळालेली मते विचार करायला लावणारी आहेत.
प्रा. संजय मंडलिक यांचे राजकीय घराणे असूनही जनतेशी नाळ जुळवण्यात ते कमी पडल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शेवटच्या वर्षात आणलेला विकास निधी व त्यातून केलेली विकासकामे ही लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या मनात रुजवण्यातही ते कमी पडले. तसेच उमेदवारी जाहीर होण्यात झालेला उशीरही अपयशाला कारणीभूत ठरला आहे.
मंडलिकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा यांच्या मतदारसंघातील सभा मतात रूपांतर करण्यात प्रभावी ठरल्या नाहीत, तर खासदार अमोल कोल्हे यांची कागलमधील सभा चर्चेची ठरली. गडहिंग्लजमध्ये जनता दल व राष्ट्रवादी पारंपरिक विरोधक आहेत. स्थानिक नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच प्रचार करण्यात आला. येथेही शाहू महाराज यांच्याकडे बघूनच मतदान झाल्याचे चित्र आहे. उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजप एकत्र असतानाही शाहू महाराजांना चांगले मतदान झाले आहे. अवघे १७०० मताची मताधिक्य मंडलिक यांना मिळाले.
मतदारसंघात संविधान बचावाच्या मुद्द्यावर काही समाज व पुरोगामी विचाराचे लोक एकत्र झाल्याचे चित्र होते. त्यातून संविधान बचावाचा नारा प्रभावी ठरल्याचे दिसते.
या निवडणुकीत कागलच्या मतदारांकडून मंडलिकांचा अपेक्षाभंग झाला, तर माजी आमदार संजय घाटगे यांनी शाहू महाराज यांच्यासाठी कागल मतदारसंघात एकाकी संघर्ष केला. शाहू महाराजांच्या विजयाने संजय घाटगे यांच्या गटाला ऊर्जितावस्था मिळाली आहे.

परिणामकारक घटक
-तीन नेते एका बाजूला व जनता दुसऱ्या बाजूला अशी अवस्था
-प्रा. मंडलिक यांना त्यांच्या होम पिचवरच मताधिक्य कमी पडल्याचा तोटा
-शाहू महाराजांच्या विजयाने माजी आमदार संजय घाटगे गटाला ऊर्जितावस्था
-तालुक्यातील मतदारांकडून मंडलिकांचा अपेक्षाभंग
-पक्ष नसतानाही गडहिंग्लज व उत्तूर परिसरातून शाहू महाराजांना चांगली मते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com