मतदान कर्मचारी साहित्यासह रवाना

मतदान कर्मचारी साहित्यासह रवाना

Published on

7538
कागल : कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाताना कर्मचारी.
...........
मतदान कर्मचारी साहित्यासह रवाना

कागल मतदारसंघात ३५८ केंद्रे ः २ हजार २०७ कर्मचारी नियुक्त

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १९ : निवडणूक विभागाने कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मतदानाच्या निमित्ताने मतदारसंघातील ३५८ मतदान केंद्रांसाठी आज निवडणूक साहित्याचे वितरण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी शासकीय वाहनातून मतदान केंद्रावर रवाना झाले.
विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातील मतदानाची जबाबदारी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्यावर सोपविली आहे. त्यांना कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे व आजरा तहसीलदार समीर माने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार्य करत आहेत. त्यांच्या उपस्थितीत निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
कागल विधानसभा मतदारसंघात कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज या शहरांसह १२८ गावांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण ३ लाख ४३ हजार ६७२ मतदार असून, १ लाख ७१ हजार ३५६ पुरुष, तर १ लाख ७२ हजार ३११ महिला व इतर ५ मतदार आहेत. मतदारसंघात ३५८ मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक कामकाजासाठी ३५८ मतदान केंद्रांवर २ हजार २०७ कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, अधिकारी एक, दोन, तीन, पोलिस कर्मचारी, शिपाई असे कर्मचारी असणार आहेत, तर जादा मतदार असलेल्या ६२ ठिकाणी अधिकारी चारची नियुक्ती केली आहे. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान ११ तास मतदान प्रकिया चालणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. १४ पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार व कर्नाटक गृहरक्षक दलाचे जवान असा सुमारे ६०० हून अधिक बंदोबस्त तैनात केला आहे. कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी ५९ एसटी बसेस, १४ जीप व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४३ वाहनांची तरतूद केली आहे.
मतदारसंघात १३ ठिकाणी थीम मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये संत रोहिदास विद्यामंदिर कागल येथे सांस्कृतिक वारसा, गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल येथे महिला सक्षमीकरण, बानगे येथे कुस्ती पंढरी, कौलगे येथे सैनिकांचे गाव, लिंगनूर कापशी येथे कापशी चप्पल, करनूर येथे टाकाऊपासून टिकाऊ, व्हन्नूर येथे बालस्नेही पंचायत, बहिरेवाडी येथे जे. पी. नाईक शिक्षणतज्ज्ञ, मुरगूड येथे वनराई, म्हाकवे येथे गुणवंत शाळा, नानीबाई चिखली येथे ऐतिहासिक वारसा, सुळकूड येथे तांदूळ विविधता, गडहिंग्लज येथे हरित गडहिंग्लज (पशुसंवर्धन) व हरित गडहिंग्लज (पक्षीसंवर्धन) यांचा समावेश आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com