कोल्हापूर .लांबपल्याच्या तिकिट बुकिंगसाठी प्रवाशी रांगेत.. मध्यवर्ती बसस्थानकात सुविधांची वानवा..

कोल्हापूर .लांबपल्याच्या तिकिट बुकिंगसाठी प्रवाशी रांगेत.. मध्यवर्ती बसस्थानकात सुविधांची वानवा..

07757

लांबपल्ल्याच्या तिकिटासाठी प्रवासी तिष्ठत
बुकिंगसाठी एकच कर्मचारी; मध्यवर्ती बसस्थानकातील चित्र

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ : शनिवार, रविवारसह सध्या उन्हाळी सुटीचे दिवस असल्याने कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. शहर व परिसरातून पुणे, मुंबईला कामासाठी व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांचीही संख्या तितकीच असल्याने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. अशावेळी बसस्थानक प्रशासकाकडून लांब पल्ल्याच्या तिकीट बुकिंगसाठी एकच कर्मचारी असल्याने प्रवाशांना तासतास रांगेत उभे राहून बुकिंग करावे लागते. यामुळे ज्येष्ठ नागरिक व कडेवर बालक घेऊन रांगेत थांबलेल्या महिलांना त्रास होत आहे.
बसस्थानक परिसरातील सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांची गर्दी असते. स्थानक परिसरात जाताना व बाहेर पडताना विक्रेत्यांच्या गर्दीमुळे चालकाची कसरत होते. रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. लांब पल्ल्यासाठी मुबलक गाड्या असल्यातरी प्रवाशांना बसस्थानकावर अनेक तास ताटकळत बसावे लागते. सध्या कोल्हापूर विभागाकडे शिवनेरी, शिवशाही व शिवाईसह इतर ठिकाणांहून येणाऱ्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही नियोजनाअभावी सुविधांबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

चौकट.
धूळ, खड्डयांचे साम्राज्य
नूतनीकरणाच्या प्रतीक्षेतील बसस्थानकाची अवस्था दयनीय असून परिसरात असणारे खड्डे आणि भर उन्हात मातीच्या धुळीने प्रवाशांना अक्षरश: तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

चौकट.
बुकिंगसाठी नियोजन व्हावे.
पुणे, मुंबई व इतर लांब पल्ल्यासाठी प्रवास करताना प्रत्येकाला योग्य ठिकाणी बसण्याची सोय व्हावी यासाठी अनेकजण बुकिंगसाठी येतात. मात्र बुकिंग केबीनमध्ये एकच कर्मचारी असल्याने प्रवाशांना तासन्‌तास रांगेत उभा राहावे लागते. प्रवाशांनी बुकिंगसाठी योग्य नियोजन व्हावे, असे बोलून दाखविले.

कोट.
गडहिंग्लला जाण्यासाठी बुकिंग रांगेत किमान दीड तासांपासून उभी आहे. कर्मचारी वेळेनुसार काम करतात. बुकिंग व्यवस्था सुधारणे गरजेची आहे.
- रजनी मांगलेकर, प्रवासी

मी स्वतः प्रत्येक शनिवारी व रविवारी शिवशाहीमधून प्रवास करतो. या बससाठी बुकिंग करताना दर आठवड्याला किमान तीन तास तरी रांगेत थांबावे लागते. आपण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.
- स्वप्नील कुलकर्णी, आर. के. नगर

कोट.
कोल्हापूर बसस्थानक प्रशासनाकडे शिवनेरी १०,शिवशाही १२ व शिवाई ६ अशा लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. प्रवाशांकडून एसी गाड्यांची मागणी होत आहे. जुन्या गाड्यांमुळे थोडासा उशीर होतो. इलेक्ट्रिकल बसची संख्या वाढल्यावर ही समस्या कमी होईल. सध्या बुकिंग व्यवस्था सुरळीत आहे.
- मल्लेश विभूते, सहा.वाहतूक अधीक्षक, मध्यवर्ती बसस्थानक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com