कंदलगाव.कंदलगाव तलाव जॅकवेलची गळती थांबेना
09924
कंदलगाव तलाव जॅकवेल गळकेच
महिन्यापासून पाणी वाया; उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव; ता. १८ : कंदलगाव तलावातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी जॅकवेल नादुरुस्त झाल्यामुळे महिन्यापासून अखंडरीत्या वाहत आहे. जॅकवेलची गळती थांबली नाही तर तलावातील पाणीसाठा कमी होऊन उन्हाळ्यात स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
कालव्याद्वारे सोडण्यात येणारी पाण्याची आवर्तने नियोजनाप्रमाणे चालतात. मात्र महिन्यापासून जॅकवेल नादुरुस्त झाल्याने सोडण्यात येणारे पाणी बंद होत नसल्याने दोन ते अडीच फूट उंचीचे पाणी तलावातून अखंडरीत्या वाहत आहे. पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान रब्बी हंगामासाठी तलावातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. पाण्यावर परिसरातील शेतीमध्ये गहू, भाजीपाला, ज्वारी, सूर्यफूलासारखी रब्बी पिके घेतली जातात. महिन्यापासून तलावाच्या जॅकवेलमध्ये बिघाड झाल्याने तलावातून बाहेर पडणारे पाणी पूर्णपणे बंद होत नसल्याने या काळात तलावातून अखंड गळती सुरू आहे. तलावापासून दीड किमी अंतरावरील कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागल्याने हे पाणी ओढ्या-नाल्यांतून वाया जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग उन्हाळ्याचा विचार करता तलावात पाणीसाठा उरणार नाही या भीतीपोटी नाराजी व्यक्त करीत आहे.
चौकटी
तलावाची पातळी खालावली
जॅकवेल नादुरुस्तीमुळे तलावातून दिवस-रात्र पाणी वाहत आहे. वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने हे पाणी शेतीला न जाता ओढ्या-नाल्यांतून वाहत आहे. संबंधित विभागाने त्वरित याबाबत दक्षता घेऊन तलावाची गळती थांबवावी; अन्यथा आंदोलन करू, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
माहिती दिली तरी दुर्लक्ष
४५ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी तलाव जीवनदायिनी ठरला आहे. उन्हाळ्याची पाणीटंचाई लक्षात घेता तलावात मुबलक पाणीसाठा ठेवणे गरजेचे असते. यासंबंधी पाटबंधारे विभागाला शेतकरी व गावातील नागरिकांनी माहिती देऊन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कोट
जानेवारी ते जूनपर्यंत तलावातील पाणी शेतकऱ्यांसाठी गरजेचे असते. यंदा पाणी जॅकवेल नादुरुस्तीमुळे वाया जात आहे. शेतकरी व पशुपालकांसाठी उन्हाळ्यात पाण्याची खरी गरज असते. असे असूनही वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग नाराज आहे.
- अंबाजी पाटील, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

