

10410
काम संथ, कोंडी नित्य
आर. के. नगर मुख्य चौकातील चित्र; वाहनधारकांची कसरत
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २५ : तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाला संथगती असल्याने वाहतूक धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
वाढती वाहतूक आणि कॉलनीतील वाढते नागरीकरण यामुळे आर. के. नगर ते कंदलगाव आणि जरग नगर ते शांतिनिकेतन शाळा या मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, यासाठी अनेक दिवसांपासून नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तीन महिन्यांपासून या ठिकाणी कामाची सुरुवात केली आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदाई, दगडांचे ढीग, माती यामुळे प्रवाशांना रस्त्यावर कसरत करावी लागत आहे.
धोका कायम.
आर. के. नगर ही कंदलगाव, मोरेवाडी व पाचगाव यासह परिसरातील गावांसाठी मोठी बाजारपेठ मानली जात आहे. येथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांकडून गर्दी होत असल्याने मुख्य चौकात वाहतूक कोंडी नित्याचाच विषय आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस असून अनेक विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी व शाळेतून आणण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच या चौकात होणारी वाहतूक कोंडी यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका कायम आहे.
रस्ता मृत्यूचा सापळा
आर. के. नगर रिंगरोडवर वर्षभरात दहा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर वाहतूक वेगवान असल्याने अनेकदा मागणी असूनही रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
कोट
सध्या रस्त्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी खोदाई केलेली आहे. खोदाईमुळे वाहतूक कोंडी तर होतेच. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अवजड वाहने पार्किंग केल्याने पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण होत आहे.
- सचिन शेळके, प्रवासी
तीन ते साडेतीन महिन्यांपासून रस्त्यावर काम सुरू आहे. ठेकेदाराने खोदाई केलेली आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नेमके हे काम कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक-दीड महिन्यावर पावसाळा आलेला आहे. पावसाळ्याआधी काम होणे गरजेचे आहे.
- सचिन जाधव,स्थानिक
आर. के. नगरचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. संध्याकाळी चौकात गर्दी होत असून या रस्त्यावर अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून दिलासा द्यावा.
- शिवाजी पाटील, गिरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.