कळंबेश्वरीदेवी उत्सव

कळंबेश्वरीदेवी उत्सव

02099, 83499

पट्टी ः श्री महालक्ष्मी अंबाबाईदेवी होमहवन सोहळा विशेष


कळंब्याचे ग्रामदैवत
कळंबेश्‍वरीदेवी

१३२ वर्षांचा कालखंड पूर्ण करणाऱ्या श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीला कळंबे तर्फ ठाणे गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. कळंबा तलावाच्या काठाला श्री महालक्ष्मी देवीचे प्राचीन मंदिर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी नागरी वस्तीमुळे कळंबा तलावाचे प्रदूषण होऊ नये म्हणून उत्तर दिशेला कळंबा गाव स्थलांतरित केले. त्यामुळे लोकसहभागातून अंबाबाई देवीचे रेखीव मंदिर बांधले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देवीचा होमवहन उत्सव सोहळा होत आहे. आठवडाभर धार्मिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाले. श्री महालक्ष्मी अंबाबाईदेवी भक्तगण मंडळ, कळंबा ग्रामपंचायत, तरुण मंडळ तालीम संस्था महिला बचत गट ग्रामस्थांच्या पुढाकाराने उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त....
--------------
करवीर महात्म्यात उल्लेख
श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा करवीर महात्म्यात कळंबे ईश्वरीदेवी म्हणून उल्लेख आहे. त्या देवीला कोल्हासुराची पत्नी म्हणून संबोधले जाते. कोल्हासूर व कळंबेश्वरीदेवी देवी या पती-पत्नीने करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची तपस्या केल्यानंतर महालक्ष्मीने प्रसन्न होऊन पती-पत्नींना वरदान मागण्यास सांगितले. कळंबेश्वरी व कोल्हासुराने करवीर (आत्ताचे कोल्हापूर) देशाचे राज्य करण्यास मिळावे, असा वर मागितला. करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीने त्यांना तसे वरदान दिले; परंतु कोल्हासुराच्या दोन पुत्रांनी देव-देवतांवर आक्रमण करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईने दोन्ही पुत्रांचा युद्ध करून वध केला. दोन्ही पुत्रांचा वध सहन न झाल्यामुळे कोल्हासुराने श्री महालक्ष्मीदेवी आणि देवतांशी युद्ध केले. यात कोल्हापुराचा वध झाला; परंतु शिवभक्त कळंबेश्वर देवीचे स्थान अबाधित राहिले. त्यामुळे देवीला श्री महालक्ष्मी अंबाबाईचे रूप मानले जाऊ लागले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

लोकसहभागातून मंदिराचा जीर्णेद्धार
कोल्हापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत दडलेल्या कळंबे तर्फ ठाणे या गावामध्ये छोट्या जलाशयाच्या तीरावर कळंब श्री देवीचे प्राचीन मंदिर आहे. जलाशयाचे तलावात रूपांतर झाल्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी येथे नागरी वस्ती वाढली; तर तलावाचे प्रदूषण होईल व जलसाठ्याला त्याची झळ पोहचेल म्हणून महाराजांनी काठावरील वसलेले गाव स्थलांतरित केले. त्यामुळे ग्रामस्थांनी पांढरी माती, घडीव दगड, कौले व लाकडी साहित्याचा वापर करून गावात महालक्ष्मी देवीचे मंदिर बांधले. हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे २००३ पासून मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू केले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने वर्गणी गोळा करून व देणगीच्या माध्यमातून मंदिराचे १४ मे २००७ मध्ये बांधकाम पूर्ण केले तेव्हापासून मंदिरामध्ये श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा सोहळा साजरा करण्यात येतो.

सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप
उत्सवानिमित्त मंदिरात होमवहन, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. महालक्ष्मी देवीचे महात्म्य वाढत असल्यामुळे कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी, बालिंगे, पाचगाव व उपनगरांतील भाविक मोठ्या संख्येने दररोज दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे या सोहळ्याला मोठ्या उत्सवाचे स्वरूप येत आहे. दैनंदिन महालक्ष्मी अंबाबाई देवीची सालंकृत पूजा बांधण्यात येत असून यावेळी विविध सोन्या-चांदीचे अलंकार देवीला परिधान करण्यात येतात. भरजरी व नक्षीकामातील शालू देवीला परिधान करण्यात येतात. पूजेचा मान गावातील गुरव समाजाकडे असून दररोज सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी श्री महालक्ष्मी देवीची आरती केली जाते. प्रत्येक अमावस्येला पालखी सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे; उजव्या हातात गदा व डाव्या हातात अमृतपात्र आहे. श्रीमूर्ती उत्तराभिमुख असून सिंह वाहन आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे वज्रलेपाचे काम पूर्ण केले आहे. मंदिरातील गाभाऱ्यासमोर श्री महादेवाचे देवस्थान आहे. श्री गणपती, श्री विठ्ठल-रुक्माई यांच्या देखण्या मूर्तींची प्रतिष्ठापना मंदिरात केली आहे. मंदिर परिसरात पश्चिम बाजूला वटवृक्षाखाली नरसिंहाची मूर्ती आहे. येथे विविध देवतांचे वीरगळ आहेत. मंदिरासमोर दोन द्वारपाल असून भव्य तुळशी वृंदावन आहे.

चौकटी
कळंब्याच्या नावलौकिकाचे शिलेदार
गावातील महिलांनी प्रशासन सेवेत सर्वोच्च पद भूषवले आहे. अश्विनी अमर रामाणे भोगम देशातील पहिल्या तरुण महापौर ठरल्या आहेत. त्यांनी महापालिकेचा उत्तमरीत्या कार्यभार सांभाळून प्रशासनावर कामाची मोहर उठवली आहे. सरपंच सुमन गुरव, पंचायत समिती सदस्या मंगल तिवले, जिल्हा परिषद सदस्य मनीषा टोणपे यांना शाहू पुरस्काराने सन्मानित केले आहे. पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील यांनीही पंचायत समितीमध्ये उत्तमरीत्या कार्यभार सांभाळला आहे. या महिला भगिनींचा गावच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. पोलिसपाटील पद अनिता तिवले सांभाळत असून त्यांच्याकडे तीन ते चार गावांचा कार्यभार आहे. येथील अनेक मुली परदेशात स्थायिक झाले आहेत. तसेच कळंबा येथील शशिकांत दिनकर तिवले यांनी गव्हर्नमेंट बँकेचे चारवेळा अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या ते संचालक पदावर कार्यरत आहेत. बाबा देसाई यांनी भाजप संघटन मंत्री व गोकुळचे संचालकपद भूषवले आहे. कुस्तीगीर मल्लांत सागर येळके, सचिन कदम, शिवतेज चौगुले, हर्षवर्धन पाटीलसह अनेक कुस्तीगीर मल्लांनी चमकदार कामगिरी केली आहे. सीबीएसईत आयुष रणजित कोंडेकर तर शिष्यवृत्तीत तनया सचिन तिवले, कादंबरी निवास तिवले, स्वरा संग्राम साळोखे यांनी राज्यात विशेष प्रावीण्य मिळविले.

कळंब्याचे उद्योगवैभव
कळंब्यातील अनेक युवा उद्योजकांनी विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेतली आहे. प्रकाश कदम, बाजीराव पोवार, दिगंबर पाटील, अजित पाटील, पंडित पाटील, श्रीकांत पाटील यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण काम केले आहे. गिरीश पाटील, प्रभंजन पाटील या सुवर्ण कारागिरांनी ज्वेलरी व्यवसायात मोठी वाटचाल सुरू केली आहे. भारत पाटील यांनी कोकण परिसरत्त अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करून विविध स्तरावरील टेंडर मिळवून विकासकामे सुरू केली आहेत. श्रीकृष्ण बेकरीच्या उत्पादनांना ग्राहकांमधून मागणी वाढली आहे.
विविध केक, खारी, टोस्ट, बटर, ब्रेड, मस्का पावसह दहाहून अधिक प्रकारची खुसखुशीत आणि लज्जतदार उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी त्यामधील साहित्य उत्तम दर्जाचे वापरल्यामुळे ग्राहकांची गर्दी बेकरीत असते. अरुण पाटील, श्रीकृष्ण पाटील, जय पाटील या पिता-पुत्रांनी बेकरी उत्पादनात मोहर उठवली आहे.
------------

पुरवणी संकलन
संजय दाभाडे, कळंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com