
राज्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया संथ गतीने : शिक्षकांत सभ्रमावस्था.
प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया संथ
अरविंद सुतार, सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ६ : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. २०१७ मध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेस सुरुवात झाली. मे २०१८ व २०१९ मध्ये पहिल्यांदा बदल्या झाल्या; पण कोरोनामुळे बदली प्रक्रिया रखडली. दिवाळीत मुहूर्त मिळालेली प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू आहे. पण अद्याप ती पूर्ण न झाल्याने शिक्षकांचे बदलीकडे डोळे लागले आहेत. दुर्गममधील रिक्त पदे प्रशासन बदलीने भरणार असल्याने सोयीच्या व रस्त्यावरील शाळांत काम करणाऱ्या व राजकीय वरदहस्त असणाऱ्या शिक्षक वर्गाचे धाबे दणाणले आहेत.
दुर्गम भागातील शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी बदलीचा शासन आदेश ७ एप्रिल २०२१ व त्यानंतर आलेल्या परिपत्रकानुसार सुरू आहे. नोव्हेंबर २०२२ पासून शिक्षकांची बदलीप्रक्रिया कासवगतीने आहे. टप्पा क्रमांक एक ते सहा अशा बदल्या होत आहेत. टप्पा क्र. एक ते सहा फॉर्म भरण्याच्या वेळापत्रकात वारंवार बदल होत असल्याने प्रक्रिया लांबतच आहे. एक ते पाच टप्पे पूर्ण असून सहावा टप्पा सुरू आहे. प्रत्यक्ष आदेश १ ते १५ मे कालावधीत मिळण्याची शक्यता आहे. बदली प्रक्रियेतून सुगम क्षेत्रात जास्त वर्षे सेवा झालेले शिक्षकांना सहाव्या टप्प्यांत ‘दुर्गम’मधील शाळा निवडावयाची असल्याने गुरुजींचा जीव टांगणीला लागला आहे. संवर्ग एक व संवर्ग दोन यांना जवळची शाळा मिळण्याची संधी आहे. जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना २५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान कार्यमुक्त करावे. २०२३ ची बदली प्रक्रिया १० जून २०२३ पर्यंत पूर्ण करावी अशी शिक्षक वर्गातून मागणी होत आहे.
---
चौकट
दुर्गम शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना
दुर्गम शाळांमधील अध्यापक १४ पदे, विषय शिक्षक (गणित व विज्ञान ११, पदे, भाषा ६, समाजशास्त्र १) अशी रिक्त पदे आहेत. दुर्गम भागातील शिक्षकांची सोय होण्यासाठी बदली प्रक्रिया सुरू केली. दुर्गम भागातील शिक्षकांना टप्पा क्रमांक तीनमध्ये ठेवून व रिक्त जागा न दाखवून अन्याय केल्याचे शिक्षकांतून बोलले जात आहे.