रोहिणीचा पेरा अखेरच्या टप्प्यात : आता प्रतीक्षा पावसाची.

रोहिणीचा पेरा अखेरच्या टप्प्यात : आता प्रतीक्षा पावसाची.

05710
रोहिणीचा पेरा अखेरच्या टप्प्यात
प्रतीक्षा पावसाची; भुदरगडला १३ हजार हेक्टरवर लागवड

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा

कोनवडे, ता. २ : भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेकडील कुर, मिणचे परिसरात रोहिणी नक्षत्रात सुरू झालेली भात पेरणी अंतिम टप्प्यावर आली असून मृग अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपल्याने शेत शिवारात लगबग सुरू आहे. अखेरच्या टप्प्यातील पेरणीची शेतशिवारात झुंबड उडाली आहे.
भुदरगड तालुक्यात यावर्षी १३ हजार ८९० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार आहे. उसापाठोपाठ भात हेच सर्वाधिक क्षेत्रावर घेतले जाणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भात पेरणी हंगाची लगबग सुरू आहे. मागील आठवड्यात वळीव पावसाने हजेरी लावल्याने पेरणीस पोषक वातावरण तयार झाले.
यंदा भात बियाणे व कीटकनाशके यांच्या किरकोळ दरवाढ झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परंपरागत भात बियाण्यांचा पेरा न करता कमी दिवसांत येणारे व जादा उत्पन्न देणाऱ्या संकरित भात बियाण्यांना मागणी मोठी आहे. जिल्ह्यातील ७ लाख ७६ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ५ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यामध्ये ४ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र निव्वळ पेरणी क्षेत्र असून, यंदा ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून, मान्सून वेळेत हजर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


चौकट
बळीराजाचे नजर आकाशाकडे
साधारण दरवर्षी जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यादरम्यान मान्सून पावसाचे आगमन होत असते. यंदा मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या पेरणीची झुंबड उडाली असून ती अंतिम टप्प्यात आहे आता बळीराजास प्रतीक्षा आहे ती पावसाची. त्याचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com