२२ वर्षांपासून रखडला आप्पाचीवाडी प्रकल्प; मोबदल्याच्या वादात काम ठप्प, ठेकेदाराच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांची प्रतीक्षा.

२२ वर्षांपासून रखडला आप्पाचीवाडी प्रकल्प; मोबदल्याच्या वादात काम ठप्प, ठेकेदाराच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांची प्रतीक्षा.
Published on

09729
आप्पाचीवाडी (ता. भुदरगड) येथील निधी असूनही गेली २२ वर्षे रखडलेला आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प.
-
आप्पाचीवाडी प्रकल्प २२ वर्षांपासून रखडला
७० टक्केच काम पूर्ण; पूर्णत्वानंतर येणार १५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. २६ : भुदरगड तालुक्यातील मिणचे खोऱ्याला वरदान ठरणारा आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प निधी असूनही ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे तब्बल २२ वर्षांपासून रखडला आहे. सध्या प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी उर्वरित काम रखडले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नशिबी अद्याप निराशाच आली आहे. जलपूजन होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी शेतकऱ्यांना सिंचनासाठी थेंबही मिळालेला नाही.
मिणचे खोऱ्यातील लोटेवाडी, आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, मोरस्करवाडी, बोंगार्डेवाडी, पंडिवरे, नवरसवाडी, बसुदेव धनगरवाडा, मिणचे खुर्द यांसह परिसरातील १२ गावांच्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे १५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
२००४ मध्ये जलसंधारण विभागाने ४ कोटी ११ लाख ४९ हजारांच्या खर्चास मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील जमिनींचा मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर नऊ वर्षे हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडला. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कामास पुन्हा सुरुवात झाली.
दरम्यान, बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे व सुधारित अंदाजपत्रकामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल ३२ कोटी ६२ लाखांवर गेला. वाढीव निधी मंजुरीसाठीची फाईल मंत्रालयीन स्तरावर अनेक वर्षे प्रलंबित होती. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या भागातील पाणीटंचाई व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकल्पासाठी वाढीव निधी मंजूर झाला आणि कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली.
धरणाच्या मुख्य बांधकामाचा मोठा भाग पूर्ण झाला असला तरी पिचिंग, सांडवा, रस्ते तसेच भूमिगत जलवितरण वाहिनीची कामे अपूर्ण आहेत.
बुडीत क्षेत्रातील शेतकरी वाढीव नुकसानभरपाई व झाडांच्या मोबदल्याची मागणी करीत असल्याने कामास विरोध होत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ठेकेदाराकडून कामाकडे झालेल्या दुर्लक्षामुळेही प्रकल्पाची गती मंदावल्याचा आरोप लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत.
संथ गतीने सुरू असलेली कामे आणि वेळोवेळी होणारा विलंब यामुळे ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उर्वरित कामासाठी निश्चित मुदत ठरवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ठेकेदाराने प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याआधीच पाणीसाठा केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. धरणाखालील काही शेतकऱ्यांना लाखोंची भरपाई मिळाल्यानंतरही ते जमीन कसत आहेत; मात्र प्रकल्पासाठी जमीन गेलेले शेतकरी आजही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

---
दृष्टिक्षेपात प्रकल्प-
-धरणाची उंची : २७.५७ मीटर
-रुंदी : ३ मीटर
-लांबी : २६५ मीटर
-साठवण क्षमता : १३८९ दशलक्ष घनमीटर
-सांडवा : ३५ मीटर
-प्रस्तावित कालवा : ४ किलोमीटर
-लाभक्षेत्र : १२ गावे, १५५ हेक्टर जमीन
---
चौकट :
आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पात सध्या ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातील पिचिंगचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करणार असून, भूसंपादनाची प्रलंबित रक्कमही संबंधित शेतकऱ्यांना आदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- स्वनिल पोवार, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com