
परदेशी फळ बाजार
परदेशी फळे स्थानिक फळांच्या मुळावर
चकचकीत, पॅकिंग चांगले असल्याने मागणी; स्थानिक व्यापारी, फळ उत्पादकांची मात्र कोंडी
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः देशी फळे चवदार आहेत, पण पॅकिंग कमकवुत आणि परदेशी फळ दिसायला चकचकीत, पॅकिंगही चांगले म्हणून मागणी जास्त, असे परस्पर विरोधी चित्र फळ बाजारात आहे. यात ‘पॅकिंग’ विषय कळीचा मुद्दा ठरत आहे. याचा स्थानिक फळ उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना व्यावसायिक फटका बसत आहे. ग्राहकांची छुपी फसवणूकही होते. त्याला आळा घालणार कोण, हा प्रश्न आहे.
प्रत्येक हंगामातील देशी फळाचे आरोग्यदायी महत्त्व पूर्वापार आहे. कोल्हापुरात आंबा, कलिंगड, चिक्कू, पेरू, बोरं, डाळींब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी अशा स्थानिक फळांसोबत संत्रे, सफरचंद, मोसंबी, अननस, पेरू अशी फळे बाहेरच्या जिल्ह्यातून, राज्यातून किंवा परदेशातून फळे येतात.
शाहू मार्केट यार्डात फळ बाजारात जवळपास ४० व्यापाऱ्यांकडे बहुतांश देशी फळे घाऊक विक्रीस येतात. याशिवाय १० ते १२ खासगी बड्या व्यापारी (एजंटां)कडे परदेशी फळे येतात. दोन्ही फळे स्थानिक विक्रेते खरेदी करतात. त्या फळांची रस्त्याकडेला स्टॉल्सवर विक्री होते. पारदर्शक प्लास्टिक पॅकिंग, जाळीदार धाग्यांचे किंवा कागदी बॉक्स अशा दर्जेदार पॅकिंगमध्ये परदेशी फळांना विशिष्ट चकाकी लावली जाते. त्यावर विशिष्ट ब्रॅण्डचे स्टिकर्स चिकटवतात.
देशी सफरचंद शंभर रुपये किलो असेल तर विदेशी सफरचंद दोनशे रुपये असा दुप्पट भाव असतो. यात काही स्टॉल्सवर काही वेळा स्वस्तातील दोन-चार देशी सफरचंद परदेशी सफरचंदात घालून विकण्याचा प्रकार घडतो. अन्य फळाबाबतही असे प्रकार घडतात. तेव्हा एका किलोतील बारा तेरा फळात घुसडलेली दोन-चार देशी फळे पटकन समजून येत नाहीत. यातून फसवणूक झाल्याचा अनुभव ग्राहक सांगतात.
फळ ठेवण्यासाठी विक्रेत्यांना कोल्ड स्टोरेज घ्यावे लागते. यात परेदशी फळांची मागणी वाढल्याने देशी फळांना फटका बसल्याचे दिसते. यात तासगावची द्राक्षे, सांगोला, जिनोनीचे डांळीब, पेरू, सांगली कर्नाटक सीमा भागातील चिक्कू, पेरू, कलिगंड उत्पादकांची आरोग्यदायी देशी फळे संपण्यासाठी आठवडाभर वेळ लागतो.
कोट
शहरी भागात पॅकिंग व चकचकीत फळे बघून सांगेल त्या किमतीत ग्राहक ते खरेदी करतात. कमी फळे विकूनही नुकसान कमी होते. देशी फळे स्वस्त मिळतात म्हणून फळ खरेदी करणाराही दुसरा वर्ग आहे. पण, देशी फळे शिल्लक राहिली, तर नुकसान जास्त होते, पण ग्राहक जी फळे मागतात तिच फळे आम्ही देतो. फसवत नाही, यातून शहरात परदेशी फळांची मागणी वाढत आहे.
-फिरोज बागवान, फळ विक्रेता