इतिहास संशोधन परिषदेचा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास संशोधन परिषदेचा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार
इतिहास संशोधन परिषदेचा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

इतिहास संशोधन परिषदेचा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

sakal_logo
By

72728

इतिहास संशोधन परिषदेचा विद्यापीठाबरोबर करार

मराठा इतिहासाचा होणार सखोल अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार झाल्यामुळे मराठ्यांचा स्थानिक इतिहास राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. या करारामुळे मराठा इतिहासातील अनेक पैलूंवर सखोल अभ्यास करता येणार आहे,’ असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) सदस्य सचिव डॉ. उमेश कदम यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय इतिहास संशोधन परिषद यांच्यात आज सामंजस्य करार झाला. यावेळी ते बोलत होते. या सामंजस्य करारावर डॉ. कदम यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या.
यावेळी डॉ. कदम म्हणाले, शिवाजी विद्यापीठ ही माझी मातृसंस्था आहे. या संस्थेसमवेत हा महत्त्वपूर्ण करार करीत असताना अभिमान वाटतो. मराठा इतिहास हा भारताचा मूळ इतिहास आहे. मात्र, तो परकियांनी आपल्याला सांगितला. मोडी, मराठीसह विविध स्थानिक भाषांमध्ये अद्यापही पुष्कळ इतिहास दडलेला आहे. या करारांतर्गत या इतिहासाचे संशोधन करण्यात येणार आहे. त्यांचे डिजिटलायझेशन करून तो सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे आजादी का अमृतमहोत्सवच्या निमित्ताने येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या अनुषंगाने तीन व्याख्याने आयोजित करण्यात येतील. मराठा इतिहास आणि स्थानिक स्रोत-साधने या अनुषंगानेही दहा व्याख्याने आयोजित करण्यात येतील. काही महत्त्वाच्या मराठी ग्रंथांचा अनुवाद करून त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावयाचे असेल, तर तसे प्रस्ताव सादर करण्याचीही संधी करारामध्ये असेल. या उपक्रमांसाठी प्राथमिक टप्प्यावर १५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात येईल.’
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत होणारा विद्यापीठाचा हा पहिला सामंजस्य करार आहे. मराठा इतिहास जागतिक स्तरावर नेण्याची ही खूप महत्त्वाची संधी आहे. त्यासाठी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि मराठा इतिहास संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून ऐतिहासिक साधने व दस्तावेज संस्थेला उपलब्ध करून देण्यात येतील.’
या कार्यक्रमामध्ये नवी दिल्ली आणि बंगळूर येथील भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सर्व सदस्य ऑनलाईन सहभागी झाले. मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. दत्ता मचाले आदी उपस्थित होते. इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी स्वागत केले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले.