/इचल: माध्यान्ह भोजनाची नासाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

/इचल: माध्यान्ह भोजनाची नासाडी
/इचल: माध्यान्ह भोजनाची नासाडी

/इचल: माध्यान्ह भोजनाची नासाडी

sakal_logo
By

72865 72867,72869

माणगाव : १) शेतामधील सरीत मोठ्या प्रमाणात अन्न टाकण्यात आले आहे. ३) कामगारांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सॅलडचा ढीग पडला आहे. ५) रोटी तयार करण्यासाठी मळण्यात आलेला आटा तसाच टाकण्यात आला आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
.....

कामगारांच्या मुखातील अन्नाची नासाडी

माणगाव परिसरातील शेतात टाकले माध्यान्ह भोजन

इचलकरंजी, ता. ३ ः कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी येथील बांधकाम कामगारांसाठी बनविण्यात येत असलेल्या माध्यान्ह भोजन किचन परिसरामध्ये हजारो कामगारांच्या मुखातील अन्न शेतामध्ये फेकून देण्यात आले आहे. माध्यान्ह भोजनाची इतक्या मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे पाहून या योजनेची जबाबदारी असणाऱ्यां‍च्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे. योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या होते का? नासाडी झालेल्या अन्नाची रक्कम शासनाकडून वसूल करण्यात येत आहे का? या कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यां‍चे नियंत्रण आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
इचलकरंजी शहरालगत असलेल्या माणगाव (ता. हातकणंगले) परिसरामध्ये माध्यान्ह भोजन बनविण्यासाठी किचन (स्वयंपाक गृह) उभारले आहे. यामधून कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या भागातील सुमारे ६० हजार बांधकाम कामगारांसाठी अन्न तयार होते. मात्र, मंगळवारी या किचन परिसरामध्ये असलेल्या एका शेतात हजारो कामगारांची भूक भागवली जाईल, इतके अन्न टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामध्ये रोटी, भात, फळभाज्या, तसेच रोटी तयार करण्यासाठी तयार केलेला आटा टाकण्यात आला आहे. या अन्नाचा उपयोग शेतकरी खत म्हणून वापर करीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते व त्याची कल्पनाही अधिकाऱ्यां‍ना नाही, यामागचे गौडबंगाल काय आहे, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
बांधकाम कामगारांचे कामादरम्यान होणारे हाल व मिळणाऱ्‍या तुटपुंज्या उत्पन्नावर उदरनिर्वाहासाठी करावी लागणारी धडपड पाहून तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी २ जुलै २०२१ रोजी माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे बांधकाम कामगारांना दुपारच्या वेळी कामाच्या ठिकाणी सकस आहार पुरविणे होते. जेणेकरून कामगारांच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. या योजनेमुळे अनेक बांधकाम कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला होता. मात्र, काही कालावधीनंतर जेवणाचा दर्जा खालावला व विविध लाभाच्या आमिषाने बोगस बांधकाम कामगारांचे वाढते प्रमाण यामुळे अन्नाच्या नासाडीचे प्रमाण वाढत गेले.
------------
‘सकाळ’ने लक्ष वेधले
बोगस बांधकाम कामगारांची पडताळणी कॅग संस्थेकडून सुरू असल्याने अनेक बोगस कामगार व एजंटांनी चांगलाच धसका घेतला आहे. याचा परिणाम शासनाने सुरू केलेल्या माध्यान्ह भोजन योजनेवर होताना दिसत आहे. करवाईच्या धास्तीने अनेक ठिकाणी बोगस बांधकाम कामगारांनी माध्यान्ह भोजनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नोंदीत कामगारांच्या नुसार तयार होणारे अन्न शिल्लक राहत असल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्याच्या दुसऱ्या ‍दिवशीच इतके अन्न नासाडी झाल्याचे निदर्शनास आले.
-----------

योजनांचे आमिष दाखवून बोगस नोंदी
बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध ३२ योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनांचे आमिष काही एजंट नागरिकांना दाखवून बोगस नोंदी करण्यास प्रवृत्त करीत असतात. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळते. या बोगस बांधकाम कामगारांच्या मुळे खऱ्या‍ बांधकाम कामगारांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
------------
कोट
‘किचनमध्ये वेस्टेज राहणारे अन्न कंपोस्ट करण्यासाठी प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे येथील वेस्टेज अन्न बाहेर जात नाही. हे टाकण्यात आलेले अन्न बाहेरचे आहे का व ते अन्न कोठून आले, याचा शोध घ्यावा लागेल.

प्रणय वाघमोरे, किचन इन्चार्ज