
जोतिबा मंदिर परिसर
73326
कोल्हापूर : श्री जोतिबा मंदिर परिसरातील २८ गावांचे प्राधिकरण व्हावे, यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेजारी आमदार विनय कोरे, राजगोपाल देवरा, प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी.
जोतिबासह २८ गावांसाठी प्राधिकरण
---
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून प्रस्तावाची सूचना; आमदार विनय कोरे यांच्या मागणीला यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : श्री जोतिबा मंदिर व परिसरातील सुमारे २८ गावचे प्राधिकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. आमदार विनय कोरे यांनी जोतिबा मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्र्यांबरोबर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या बैठकीचे आयोजन केले. या वेळी फडणवीस यांनी आमदार कोरे यांच्या मागणीचा सकारात्मक निर्णय घेतला. तिरुपती मंदिराच्या धर्तीवर जोतिबा डोंगरावरही सुविधा देण्यासाठी या प्राधिकरणाचे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘श्री जोतिबा मंदिरासह इतर ठिकाणचा विकास करण्यासाठी प्राधिकरण करता येणार आहे. आपला इतिहास समृद्ध असून, प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन वेळीच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा गडाचे जतन व संवर्धनासाठी एकात्मिक विकास आराखडा (प्राधिकरण) तयार करावे. यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून ही कामे तत्काळ पूर्ण करावीत. यापूर्वी परिसराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांच्या परिपूर्ण नोंदी ठेवण्यात याव्यात. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. जेणेकरून नव्या पिढीपर्यंत आपला समृद्ध इतिहास अधिक नेमकेपणाने पोचविता येईल.’’
आमदार विनय कोरे म्हणाले, ‘‘श्री जोतिबा मंदिरासह सुमारे २८ गावांचे प्राधिकरण झाल्यास या सर्व गावांचा विकास करता येणार आहे. याशिवाय, पन्हाळा गडाचाही यात समाविष्ट करावा. श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला ही ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. श्री जोतिबा मंदिर परिसर वन्यजीव विविधतेमध्येही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथील हरित पट्टयांचे जतन व संवर्धन केल्यास वन्यजीव अधिवासातच जपता येतील. येथे भूमिगत वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे तसेच दर्शन मंडपाची कामे हाती घेण्यात आली असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय, जोतिबा डोंगरावर सासन काठ्या घेऊन येणाऱ्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना आवश्यक सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.’’ या वेळी प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्त्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र यादव, संचालक डॉ. तेजस गर्गे, कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
---------------
कोट
५० लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय पातळीवरील अभियंता घेऊन जोतिबा डोंगरासह २८ गावांचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाची रचना कशी करता येईल, याचे नियोजन केले जाईल. टोप, कुशिरे, पडवळवाडी, अंबप, माले, केखले, मनपाडळे, सातवेसह इतर गावांचा यात समावेश असणार आहे.
- विनय कोरे, आमदार