
३३
निष्कलंक नेता
राजकारण म्हणजे डावपेच, नागमोडी वळणाचे, प्रतिस्पर्ध्यावर फणा काढणारे, शह-काटशह, कुरघोडी, साम-दाम-दंड-भेद ही नीती. मात्र, आजही या महाराष्ट्रात, जिल्ह्यात असे काही राजकारणी आहेत की, त्यांनी सक्रिय राजकारणात राहूनही सभ्यता जपली आहे. त्यामध्ये आमदार पी. एन. पाटील - सडोलीकर यांचे नाव आघाडीवर आहे. चाळीस वर्षे राजकारणात राहूनही चारित्र्य निष्कलंक ठेवले. ‘पी. एन.’ यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवाहात येऊन राजकीय कारकीर्द सुरू केली. प्रत्येक कार्यकर्ता लाखमोलाचा असे समजून पी. एन. पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांची फळी तयार केली. जिल्ह्यात आणि विशेषतः करवीर तालुक्यात त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत.
पी. एन. पाटील कोल्हापुरातील श्रीपतराव बोंद्रे (दादा) यांचे जावई; पण त्यांनी सासऱ्यांच्या राजकीय वलयाचा लाभ घेतला नाही. स्वतःच्या हिमतीवर लढले. पहिल्यांदा ते जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले. त्यानंतर सतत संचालक म्हणून निवडून येऊ लागले. सलग पाच वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले. या संधीचे सोने करताना फक्त राज्यातच नव्हे, तर देशात प्रथमच केवळ ७ टक्के दराने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही, तर भूमिहीन शेतकऱ्यांनाही जिल्हा बँकेद्वारे कर्जपुरवठा करणारे ते पहिले चेअरमन ठरले. शेतकऱ्यांसाठी वाहन कर्ज योजनाही पी. एन. पाटील यांनीच सुरू केली, जिल्हा बँकेची सत्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत असतानाच त्यांनी सक्रिय राजकारण सुरू केले. श्रीपतरावदादा बोंद्रे यांना विधिमंडळात ज्येष्ठत्वाचा मान देऊन त्यांचा आदर करणारे तत्कालीन मंत्री की, जे पुढे महाराष्ट्राचे बराच काळ मुख्यमंत्री बनले, त्या विलासराव देशमुख यांच्या खास वर्तुळात पी. एन. पाटील यांनी स्वतःची जागा निर्माण केली होती.
काँग्रेसशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटना बळकट करणाऱ्या पी. एन. पाटील यांना निवडणुकीच्या राजकारणात यशापेक्षा अपयशाला सामोरे जावे लागले, पण तरीही अपयशाने ते कधी खचून गेले नाहीत. त्यांच्या निवडणुकीतील अपयशाबद्दल विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरच्या त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमात या माणसाच्या आयुष्यात अपयशाचे किती अपघात यावेत, असे भावनिक उद्गार काढले होते. विलासराव देशमुख माझा विठ्ठल, असे पी. एन. पाटील म्हणायचे. राजकारणात विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्याशी पी. एन. पाटील यांनी कधीही वैरभावाची भूमिका घेतली नाही. कार्यकर्ता हे त्यांच्या राजकारणाचे भांडवल आहे. या भांडवलाला त्यांनी कधीही धक्का लावला नाही. हा जवळचा आणि तो दूरचा असा केला नाही. म्हणूनच राजकारणातील सभ्य माणूस अशी त्यांची या जिल्ह्यात ओळख आहे. गेली चाळीस वर्षे पी. एन. पाटील राजकारण व समाजकारण करत आहेत.
एवढ्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी कधीही फळाची अपेक्षा केली नाही किंवा तत्त्वाशीही तडजोड केली नाही.
काँग्रेस पक्ष आणि तळागाळातील कार्यकर्ता हेच दैवत मानून वाटचाल केली. खेड्यापाड्यातील व त्यांच्याकडे कामानिमित्ताने गेल्यास त्यांना योग्य न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे जाणारा कोणीही निराश होत नाही. तसेच त्यांनी अनेक विकास सेवा संस्था, दूध संस्थांची उभारणी केल्यामुळे अनेक युवकांच्या हाताना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे गोरगरिबांचे संसार सुखाने चालले आहेत. तसेच गट-तट न मानता विकास करण्याचे बाळकडू - कार्यकत्यांना दिले आहे.
अगदी रात्री-अपरात्री कार्यकत्यांचा फोन आला तरी त्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या पी. एन. पाटील यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते हीच त्यांची दौलत आहे. आमदार म्हणून काम करताना त्यांनी कार्यकत्यांच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कामे केली आहेत. कार्यकत्यांचा स्वाभिमान जागृत ठेवून विकासासाठी अहोरात्र धडपडणारे चैतन्यदायी नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. या विकासाभिमुख स्वाभिमानी नेत्यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
- सुरेश पाटील, सोनाळी