
उजव्या बाजूने जावा...
उजव्या बाजूने चाला, अपघात टाळा!
व्हिडिओ व्हायरलः नियम आणि कायदा नेमके काय सांगतो?
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूंनी जावे, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण उत्सुकतेने हा फॉरवर्ड करीत आहेत. रस्ते सुरक्षा अभियान जानेवारी महिन्यात होते. यावर्षी ते अद्याप जाहीर झालेले नाही. तरीही याच कालावधीतील हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.
रोज सकाळी चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, प्रकृती तंदुरुस्त राहते. त्यामुळे डॉक्टरांसह अनेक ग्रंथांमध्ये व्यायाम आणि चालणे आवश्यक असल्याचे संदर्भ येतात. हेच आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगण्यात येत आहे. रस्ते वाहतुकीबाबत जो कायदा १९८८ मध्ये झाला आहे, त्यामधील नियमातही ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत, त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, असे स्पष्ट केले आहे. ज्यामुळे समोरून येणारे वाहन पादचाऱ्याला दिसले पाहिजे. एखादे वाहन वेगात येत असल्यास किंवा त्यामुळे अपघात होत असल्यास बचाव करणे सोपे जाते. शहर वगळता इतर ठिकाणी फूटपाथ नसतात. त्यामुळे शक्यतो रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, असे सांगण्यात येते. यामुळे अपघात टाळता येणे शक्य आहे.
प्रा. श्रीपाल जर्दे यांनी लिहिलेल्या ‘आरोग्यदायी चालणे - शास्त्र - तंत्र, मंत्र व लाभ’ या पुस्तिकेतही त्यांनी डॉ. किरण दोशी यांच्या माध्यमातून उजव्या बाजूने चाला म्हणजे अपघात कमी होतील, असा संदेश दिला आहे. प्रत्यक्षात हा संदर्भ प्रा. जर्दे यांनी ‘स्काउट ॲन्ड गाईड’ या पुस्तिकेचा आधार घेऊन दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक मुलगी सकाळी डाव्या बाजूने जाताना अपघातात ठार झाली असल्याचाही संदर्भ त्यांनी दिला आहे. ते सांगतात, ‘भारतामध्ये रस्त्याने चालताना सहसा पादचारी डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात होऊन मृत्यू ओढवतो. त्यामुळे उजव्या बाजूने चालण्याबाबत विविध माध्यमातून प्रबोधन करत असतो.’
कोट
रस्ते वाहतूक कायदा १९८८ आणि नियम १९८९ नुसार ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत, अशा ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. समोरून येणारे वाहन दिसावे म्हणून हा नियम आहे. विशेष करून मॉर्निंग वॉकसाठी जाताना हा नियम महत्त्वाचा ठरतो. कारण डाव्या बाजूने चालल्यास तेथे अपघात होऊ शकतात. मात्र, ज्या ठिकाणी फूटपाथ आहे तेथे डाव्या बाजूने जावे.
- दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर