
बिग स्टोरी- भरड धान्य
रिपोर्ताज…...
प्रसिध्दी- ११ जानेवारी
फोटो- ७४४२७, ८५०६९
..............
पौष्टिक तृणधान्ये खा,
आरोग्यासह जैवविविधताही जपा...!
मकर संक्रांतीनिमित्त प्रत्येक गावात होणार बाजरी महोत्सव
संभाजी गंडमाळे…
बदलत्या जीवनशैलीमुळे ऐन तारुण्यातच आता विविध आजारांना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचे वर्ष पौष्टिक तृणधान्य (भरडधान्य) वर्ष म्हणून जगभर साजरे होणार आहे. राज्यातही भरडधान्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि फायद्यांबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम होणार आहेत. त्याचा कृती आराखडा निश्चित झाला असून जिल्हानिहाय विविध कार्यक्रम होणार आहेत. यंदापासून मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यात पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक गावात दोनदिवसीय बाजरी महोत्सव भरणार आहे.
सर्वाधिक पोषणमूल्ये
सर्वांगीण आरोग्याचा विचार करता व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळविण्यासाठी सप्लिमेंटचा वापर अनेकदा केला जातो. मात्र, भरडधान्याचा आहारात वापर केल्यास त्याची गरज भासत नाही. या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे विकारही होत नाहीत. एकूणच या धान्यातून मिळणारी पोषणमूल्ये लक्षात घेऊनच हे मिशन राबवले जात आहे.
लवकरच विशेषांक
भरडधान्यांच्या उपयुक्ततेबाबत राज्य शासनातर्फे विशेषांक काढला जाणार असून, त्याच्या दीड लाख प्रती राज्यातील दहा हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहेत. त्याशिवाय वर्षातील प्रत्येक महिना ‘मंथ ऑफ मिलेट’ म्हणून साजरा केला जाणार असून, प्रत्येक महिन्यात एका भरड धान्याबाबतची माहिती विविध उपक्रमातून दिली जाणार आहे. फेब्रुवारीत प्रत्येक जिल्ह्यात ‘रन फॉर मिलेट’ आणि खाद्य महोत्सवाचा उपक्रम होणार आहे. ‘आत्मा’च्या माध्यमातून जिल्हा पातळीवर कार्यशाळांचेही आयोजन केले जाणार आहे.
.............
कोट
गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य अशा सर्वच पातळ्यांवर विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भरडधान्याचे उत्पादन क्षेत्र वाढवणे, प्रक्रिया व त्याचे पोषणमूल्य लक्षात घेऊन आहारातील वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ज्वारी, बाजरी, नागली, वरी या पिकांची उत्पादकता कमी असल्याने शेतकरी या पिकांची लागवड करत नाहीत. त्यामुळे आहारातील वापर वाढल्यास मागणी वाढून शेतकरीही आपोआप लागवडीकडे वळतील.
- विकास पाटील, संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय, पुणे
जिल्ह्यात नाचणी, राजगिरा, वरी, राळ, बाजरी आदी पिके शेतकरी घेतात; पण त्याचे क्षेत्र कमी आहे. मुळात या पिकांना कमी पाणी लागते. या धान्यांची पिके काढल्यानंतर राहणारे देठ जनावरांसाठी चारा म्हणून वापरल्यास दुधाची पौष्टिकता वाढते. त्याशिवाय या पिकांवर पक्षीही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे एकूणच जैवविविधतेसाठी म्हणून ही पिके महत्त्वाची असून त्यादृष्टीने पर्यावरण संस्था विविध कृतिशील उपक्रमांवर भर देणार आहे.
- अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भरडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असते. त्यामुळे त्याचा आहारात भरपूर वापर केला पाहिजे. अलीकडच्या काळात हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांसाठी किंबहुना हे आजार उद्भवू नयेत, यासाठी ही धान्ये अत्यंत उपयुक्त आहेत. फायबरचे प्रमाण अधिक असल्याने मुळव्याध, बद्धकोष्ठता असो किंवा पोटाचे कोणतेही विकार उद्भवत नाहीत.
- स्नेहल खांडेकर, आहारतज्ज्ञ
..........
दृष्टिक्षेपात मिशन...
- भरडधान्य मिशनसाठी राज्य शासन खर्च करणार.... २०० कोटी
- पन्नास कोटी व स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उभारले जाणारे उद्योग.... २००
- भरडधान्यावर व्याख्याने घेणाऱ्या ग्रामपंचायती... १० हजार
- भरडधान्यावरील विशेषांकाच्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रती... दीड लाख
- भरडधान्य कापणी स्पर्धांची ठिकाणे... एक हजार
...............
संभाजी गंडमाळे