
वनमजूरांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे
‘वनमजुरांना शासकीय सेवेत घ्यावे’
कोल्हापूर : वन विकास महामंडळाकडे जिल्ह्यातील ४५ वनमजूर नोकरी करीत आहेत. या वनमजूरांनी २४० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणेच वनमजूरांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी करवीर कामगार संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे केली. वन विकास महामंडळाचे कामकाज २००० साली बंद झाले. सन २००१ साली वन विभाग कोल्हापूर यांचेकडे या ४५ वनमजुरांचे हस्तांतर करण्यात आले. या वनमजूरांनी प्रत्येक वर्षी २४० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेले आहे. ही बाब महामंडळाला सादर केलेल्या कागदपत्रावरून पुढे आली आहे. ही सर्व माहिती न्यायालयाच्या निर्णयानंतर सादर केली आहे. संबंधित कामगारांना नोकरीत कायम करावे लागू नये, म्हणून मुद्दाम ही माहिती उशिरा दिली असल्याचे पत्रात म्हटले आहे. महामंडळाच्या नाशिक, नागपूर, ठाणे व पुणे आदी कार्यालयाचे अहवाल पाहिले असता जाणीवपूर्वक वन विकास महामंडळाने संबंधीत कामगारांना सेवेत कायम केलेले नाही. तरी सर्व वनमजूरांना शासकीय सेवेत सामावून घेवून सर्व लाभ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे दिलीप पवार, बी. बी. पोवार आदींनी निवेदन दिले.