
चित्रपट महामंडळ निवडणूक
लोगो- चित्रपट महामंडळ निवडणूक
..................
अपात्र सभासदांतर्फे
उच्च न्यायालयात धाव
मेघराज राजेभोसले यांनी दाखल केली याचिका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अनेक सभासदांची नावे पक्क्या मतदार यादीतून वगळली आहेत. त्याविरोधात अशा सभासदांच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून काल पात्र मतदारांची पक्की यादी प्रसिध्द झाली आहे. महामंडळाचे वर्ग ‘ब’ सभासदत्व तीन वर्षानंतर ‘अ’ वर्ग होते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी वर्ग ‘अ’ वर्ग सभासदत्व प्राप्त केले आणि अशा प्रकारचे ओळखपत्र देखील महामंडळांकडून त्यांना दिले गेले आहे. ‘अ’ सभासत्वाचे शुल्क देखील त्यांनी भरले आहे. त्यांची नावे कच्च्या मतदार यादीत समाविष्ट होती. मात्र, पक्क्या यादीतून ती वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात ॲड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच होणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.
...
पहिल्या दिवशी पाच अर्ज
निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज पहिल्याच दिवशी पाच जणांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी स्थिर व चलत छायाचित्रण गटातून, निर्मिती व्यवस्था गटातून माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, ध्वनिरेखक गटातून शरद चव्हाण, दिग्दर्शक गटातून अर्जुन नलवडे, कलादिग्दर्शक गटातून सतीश बिडकर यांनी अर्ज दाखल केले.