मंडई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडई
मंडई

मंडई

sakal_logo
By

प्रसिद्धी १५ जानेवारी

रिपोर्ताज
उदयसिंग पाटील

L74701, L74702

आस्था...! ना शेतकऱ्यांची, ना नागरिकांची

पाच रस्त्यांवर भरते मंडई, सामोपचाराने केला जातो व्यवसाय

आजूबाजूच्या गावागावांतून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील ताजी भाजी मिळण्याचे ठिकाण म्हणून शहरातील विविध भागांतील नागरिकांची अगदी सकाळी सातपासून हजेरी; पण ना बसायला कट्टा, ना डोक्यावर ऊन-पावसापासून बचावासाठी छत, ना रस्त्यावरील वाहने-भटक्या जनावरांपासून संरक्षण. रस्त्यावर कापड अंथरायचे, बुट्ट्या ठेवायच्या, त्यातच भाज्या मांडायच्या. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी भाजी-फळांचे क्रेट लावलेले. गंगावेशेतील शाहू उद्यानाच्या सभोवातलच्या पाच रस्त्यांवर दररोज भरणाऱ्या मंडईतील विक्रेते, शेतकऱ्यांची ही स्थिती. कित्येक वर्षांपासून मंडई सुरू असली तरी अधिकृतचा शिक्का नसल्याने ना शेतकरी, ना विक्रेत्यांना, ना ग्राहकांना काय सुविधा हवी याचं कुणाला काहीही पडलेलं नाही, हे सारे उघड झाले...


तासाभरातच व्यवहार...
पहाटे पाचपासून मंडईला जाग यायला लागली. गावाकडील शेतकरी, महिला केएमटी-एसटी-वडाप मिळेल त्या वाहनांनी दाखल होत होते. शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करणारे व्यापारीही जागेवर येऊन थांबले. थंडीचा कडाका असल्याने गंगावेशच्या कोपऱ्यावरील चहाच्या टपरींवर, तर कुणी हॉटेलात बसून नाष्टा करत होते. शेतकरी बऱ्यापैकी आल्यानंतर सातच्या सुमारास सारी मंडई गजबजली. काही शेतकरी भाजी व्यापाऱ्यांना विकायला घेऊन आलेले. व्यापाऱ्यांसोबत त्यांनी दर ठरवून पैसे हातात पडल्यानंतर भाजीची बोचकी ताब्यात देऊन निघूनही गेले. हा सारा कारभार तासाभरातच. कोणाला आडत, ना कोणाला रमा फी देण्याची गरज; पण बहुतांश शेतकरी, त्यातही महिला मात्र आपली भाजी मांडायला सुरूवात करत होत्या. त्यावेळी काही व्यापाऱ्यांच्या जागा ठरलेल्या असल्याने, केबिन असल्याने त्या सोडून जागा पकडण्यासाठी लगबग होती. त्याचवेळी हॉटेलवाले येऊन एखाद्या शेतकऱ्याकडील वांगी, भेंड्या, कोथिंबीर, काकडीच्या बुट्ट्याच खरेदी करत होते. त्यामुळे सकाळी आठ-नऊपर्यंत काही शेतकरी माल विकून गावीही परतत होते.

हातात छत्री अन्....
त्यानंतर डोर्ले कॉर्नरसमोरील रस्ता, तिथून शाहू उद्यानाकडे येणारा रस्ता, तिथून गंगावेशकडे तसेच हॉटेल सुवर्णकडे जाणाऱ्या रस्त्यावर व कुंभार गल्लीच्या कोपऱ्यावर दुतर्फा जागा भाजी विक्रेते व शेतकऱ्यांनी व्यापल्या. सकाळचे कोवळे ऊन अकराला चटका देऊ लागले. तसे देवाळेहून दूध, दही, अंडी घेऊन आलेल्या वयस्कर बेबीताई पाटील यांनी जवळची छत्री उघडली. एका हातात छत्री धरूनच भावताल करू लागल्या. किती वर्षांपासून येथे येताय असे विचारल्यानंतर ‘‘पूर्वी कपिलतीर्थ मार्केटमध्ये जायचो; पण काही वर्षांपासून गंगावेशेत येतो. एक कोपरा धरून बसतो. नेहमीची गिऱ्हाईकं येतात. सुविधा मात्र काय नाहीत,’’ असे सांगितले. त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलाही विक्रीसाठी आल्या होत्या. त्या साऱ्या ही एकच छत्री एकमेकांकडे फिरवत होत्या.

तीनशेवर व्यावसायिक...
शेतातील भाजीची तोड आली की, शेतकरी ते विकायला येतात. सध्या भाजीपाल्याचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांची संख्या जास्त. निगवे, केर्ले, केर्ली, जाफळे, आंबेवाडी, चिखली, कुशीरे, वाकरे, पोहाळे, देवाळे, कांडगाव, पोर्ले यांबरोबरच इतर गावांतील शेतकऱ्यांची संख्या असते. शेतकरी, विक्रेते यांचा तीनशेवर आकडा जातो, असे माजी नगरसेवक धनाजी आमते यांनी सांगितले. भाजीपाला, कांदा-बटाटा, दही-दूध-अंडी, फळ विक्रेत्यांबरोबरच परिसरात मसाले, किराणा माल, कटलरी विक्रेतेही आहेत. उद्यानाच्या जागेत एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्याच्या दारातही फळ विक्रेते बसले होते. पाच रस्त्यांवरील काही विक्रेत्यांनी मोठ्या छत्र्या लावल्या; पण बहुतांश जण डोक्यावर साडीचा पदर, टोपी, टॉवेल घेऊन उन्हापासून बचाव करत होते.

एकमेकांत सामोपचार...
समोरून दुचाकी, टेम्पो जाताना भीती वाटत नाही का? असे विक्रेते भिकाजी पोवार यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘‘शेतकरी व विक्रेत्यांची संख्या येथे जास्त व जागा कमी असल्याने त्यांच्याबरोबर स्थानिक रहिवाशांच्या सामोपचारातून मंडईचे कामकाज व्यवस्थित चालते. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे विक्रेते बसतात. फळ विक्रेत्यांना हातगाड्या काढायला लावून रस्त्यावर विक्री करायला लावले.’’ एक वाजल्यानंतर माल खपलेल्या शेतकऱ्यांनी गावचा रस्ता धरण्यास सुरूवात केली; पण जाताना उद्या कुठे येऊन बसायचे, हे डोक्यात घेऊन जात होते.