
इतरांची जाणीव ठेवून वाहने सुरक्षीत चालवा; दिपक पाटील
इतरांची जाणीव ठेवून
वाहने सुरक्षित चालवा
दीपक पाटील; एसटी महामंडळ सुरक्षितता सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ‘‘एसटी बस सुरक्षित चालवणे जबाबदारीचे काम आहे. चालकांनी स्वतः सोबत एका गाडीत बसलेल्या प्रवाशांची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी चालकांनी आरोग्य तंदुरुस्त ठेवणे तसेच व्यसनापासून दूर राहून कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. यातून अपघात कमी होण्यास मदत होणार आहे,’’ असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी महामंडळात सुरक्षितता अभियानास सुरुवात झाली. पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले, या वेळी ते बोलत होते. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के प्रमुख उपस्थित होत्या. हे अभियान २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
पाटील म्हणाले, ‘‘एखादा अपघात झाला त्यात कोणाला अपंगत्व आले किंवा कोणाचा जीव गेला, तर त्याच्या कुटूंबाला विपरित परिणाम भोगावे लागतात. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वाहन सुरक्षित चालवणे अपेक्षित आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे, वेगावर नियंत्रण ठेवून लक्षपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे. यातून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.’’
बारटक्के म्हणाल्या, ‘‘एसटीच्या यंत्रशाळेतून बस या तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत याची खात्री करून चांगल्या स्थितीत बस सेवेसाठी द्याव्यात त्यासोबत एसटी चालकांनी ही आपल्या हातून अपघात होणार नाही याचा निश्चय करून अपघात शून्य सेवा देण्याचा संकल्प करावा.’’
वाहतूक अधीक्षक उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय निगडे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप ठोंबरे यांनी आभार मानले. या वेळी एसटी चालक, वाहक, यंत्रशाळा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.