जागृती केल्यास सुरक्षीत प्रसुतीचे प्रमाण वाढेल; डॉ. संजय गुप्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृती केल्यास सुरक्षीत प्रसुतीचे प्रमाण वाढेल; डॉ. संजय गुप्ते
जागृती केल्यास सुरक्षीत प्रसुतीचे प्रमाण वाढेल; डॉ. संजय गुप्ते

जागृती केल्यास सुरक्षीत प्रसुतीचे प्रमाण वाढेल; डॉ. संजय गुप्ते

sakal_logo
By

जागृती केल्यास सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढेल
डॉ. संजय गुप्ते; स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र संघटनेतर्फे परिषद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : ‘‘गर्भधारणेच्या वेळेपासून ते प्रसूतीपर्यंत गरोदर मातांनी वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घेतल्यास प्रसूतीच्यावेळी मोठा धोका उद्‍भवणार नाही, याविषयी महिलांमध्ये जागृती केल्यास महिलांच्या सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण आणखी वाढेल तसेच गर्भधारणेतील विकार दूर होण्यास मदत होईल,’’ असे मत स्त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांनी व्यक्त केले.
स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र संघटनेतर्फे ‘ग्लोरियस २०२३’ वैद्यकीय परिषदेस आजपासून सुरुवात झाली. याचे डॉ. गुप्ते यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
डॉ. गुप्ते म्हणाले, ‘‘गर्भधारणेच्या काळात जे विकार होतात. ते तात्पुरते असतात. मात्र असे विकार होऊ नयेत यासाठी महिलांनी गर्भधारणा काळापासूनच खबरदारी घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त चांगले होईल. याच काळात वेदना कमी करण्यासाठीच्या औषधांचा वापर कमी करणे अपेक्षित आहे. कॅल्शियम वाढीस पूरक ठरणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा त्यासोबत नियमित व्यायाम करणेही गर्भवतींसाठी हिताचे ठरते.
अनेक महिला नोकरी करत कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडतात. यातून काही महिलांचा ताण वाढतो. तसा रक्तदाबही वाढतो. अशा स्त्रियांनी प्रसूती काळात तणाव विरहित जीवन जगले पाहिजे. त्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी किंवा एखादा छंद जोपासून आनंद मिळवणे हिताचे ठरते.’’
माहिती, कल्पना व ज्ञानाची देवाण घेवाण होण्यासाठी अशा वैद्यकीय परिषदांची उपयुक्तता वाढती आहे, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा सखदेव यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. सुरुची पवार यांनी आभार मानले. उपाध्यक्ष डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. ज्योत्स्ना देशमुख, डॉ. मीरा कुलकर्णी, डॉ. दीपाली पाटील, डॉ. विभावरी जोगळेकर, डॉ. इंद्रनील जाधव यांच्यासह संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेस राज्यभरातील तीनशे डॉक्टर सहभागी झाले आहेत.
या परिषदेत वंध्यत्व, लॅप्रोस्कोपी, पुनरुत्पादकक्षम औषधे, प्रसुती, स्त्रीरोग, अंकोलॉजी, कुटुंब नियोजन, लहान मुलांची वाढ, लैंगिक आरोग्य, अल्ट्रासाउंड, शासकीय योजना अशा विषयांवर चर्चा होणार आहे.
------------
चौकट
बहुविध ज्ञान उपयोगी
प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांसमोर अनेक आव्हाने असतात. गर्भवती स्त्री तसेच बाळही सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टरांना त्वरित सर्व उपचार पद्धतीचा वापर करावा लागतो. तेव्हा वेळही कमी असतो. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवी संशोधन, नवे तंत्रज्ञान, औषधाचे शास्त्र असा बहुविध शाखांचे ज्ञान समजून घेतल्यास प्रसूती तज्‍ज्ञांना सुरक्षित प्रसूती करण्यासाठी उपयोगी ठरते, असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले.