हिंदू जनसंघर्ष मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू जनसंघर्ष मोर्चा
हिंदू जनसंघर्ष मोर्चा

हिंदू जनसंघर्ष मोर्चा

sakal_logo
By

GAD1810.JPG 76602
गडहिंग्लज : राज्यासह देशात लव्ह जिहाद, धर्मांतर व गोहत्याविरोधी कठोर कायद्याच्या मागणीसाठी बुधवारी शहरातून निघालेला हिंदू जनसंघर्ष मोर्चा.

कठोर कायदा येईपर्यंत अखंड लढा
हिंदू जनसंघर्ष मोर्चाचा निर्धार; महिलांचा लक्षवेधी सहभाग, वाद्यांचा गजर

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : राज्यासह देशामध्ये लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधी कठोर कायदा अस्तित्वात येईपर्यंत अखंड लढा उभारण्याचा निर्धार आजच्या येथील हिंदू जनसंघर्ष मोर्चाद्वारे करण्यात आला. मोर्चानंतरच्या सभेत तसा ठरावही मंजूर करण्यात आला. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त होता.
हिंदुत्ववादी संघटना, महिला, तरुण-तरुणींसह विविध पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या मोर्चामुळे गडहिंग्लजमध्ये भगवेमय वातावरण होते. संकेश्‍वर रोडवरील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मेन रोड, कडगाव रोडवरून शिवाजी बँक, प्रांत कार्यालयापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत मोर्चा निघाला. विविध घोषणांसह वाद्यांच्या गजरात निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला. महिलांची संख्या लक्षणीय होती. घोषणांनी परिसर दणाणून गेला. हातात मागण्यांचे फलक घेऊन हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, महालक्ष्मी मंदिराजवळ सभा झाली. यावेळी राजश्री तिवारी म्हणाल्या, ‘लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवण्याचे प्रकार वाढताहेत. आता घराघरांत आपल्या पाल्यांना धर्म म्हणजे काय आणि धर्माचरण शिकवण्याची वेळ आली आहे. अलीकडे धर्मांतरणाचा भोंगाही मोठा होत आहे. हिंदू मुलींची फसवणूक टाळायची असेल तर संघटन हेच अस्त्र आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन या विरोधात लढा उभारूया. हा मोर्चा म्हणजे लढ्याची सुरुवात आहे.’ आजऱ्याचे नाथा देसाई, शिवप्रतिष्ठानचे राहुल शिंदे यांची भाषणे झाली. भाजपचे विस्तारक संदीप नाथबुवा यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला. बाबासाहेब भोपळे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

चौकट
मार्चमध्ये जनजागृती सभा
मार्च महिन्यामध्ये महागाव व आजरा येथे हिंदू राष्ट्र जागृती सभा, तर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात गडहिंग्लजमध्ये हिंदू राष्ट्र आंदोलन होणार आहे. त्यावेळी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तिवारी यांनी केले.