
भरडधान्यांचे वाण
76582
कोल्हापूर : येथील आदर्श सहेली मंचच्या वतीने भरड धान्य वर्षानिमित्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील यशस्वी महिला.
मकर संक्रांतीनिमित्त
दिले भरडधान्याचे वाण
बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : येथील आदर्श सहेली मंचतर्फे संक्रांत व भरडधान्य वर्षानिमित्त भरडधान्यांचे वाण देण्यात आले. हळदीकुंकू समारंभ न करत विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांनी एकत्र येत हा सोहळा सामर्थीनींचा समारंभ म्हणून साजरा केला. समाजातील वंचित व परिघाबाहेरील महिलांना सामावून घेत, त्यांचा सन्मान झाला. भरडधान्यांविषयी माहिती देऊन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केल्याचे मंचच्या अध्यक्षा राणिता चौगुले यांनी सांगितले.
बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या वेळी प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी पुढील पिढीसाठी हा बियाणांचा ठेवा जतन करून ठेवण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले. निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी भरडधान्य, तृणधान्य यांचे, महत्त्व, उपाय व लागवड या विषयी मार्गदर्शन केले. देशी भरड धान्याचे बियाणे मकर संक्रांतीनिमित्त वाण म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आले. त्यामध्ये काळा गहू, नाचणी, वरी, राजगिरा इत्यादी बियाण्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे वाण घेण्यासाठी निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंगला चौगुले, सीमा जोशी, यशोदा पाटील, रीमा मेहता, सुलोचना मोरे, आशा चौगुले, जयश्री चव्हाण, नेहा माने, अमोल सरनाईक, डॉ. राजेंद्र देवरे, दीपक पोवार, संदीप पाटील उपस्थित होते. वैष्णवी गवळी यांनी सूत्रसंचालन केले. अस्मिता चौगुले यांनी आभार मानले.