
कृती समिती कार्यकर्त्याला महापालिकेत बेदम मारहाण
L76609
कोल्हापूर ः महापालिका चौकात बुधवारी एका कार्यकर्त्याला मारहाण करत बाहेर नेतानाचा ‘हा’ व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला होता.
कृती समिती कार्यकर्त्याला
महापालिकेत बेदम मारहाण
कोल्हापूर, ता. १८ ः फुटबॉल संघ निवडीबाबत माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या तपशीलावरून कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याला आज महापालिकेच्या मुख्य इमारतीत एका पेठेतील काहीजणांनी बेदम मारहाण केली. भर दुपारी दीडच्या सुमारास शिवीगाळ, तसेच मारहाणीच्या प्रकारामुळे महापालिकेत मोठा गोंधळ उडाला. मारहाणीच्या विषयाशी महापालिकेचा संबंध नव्हता; पण तक्रारदार महापालिकेत आला होता. हल्लेखोरांनी तेथे गाठून मारहाण केली.
एका पेठेतील फुटबॉल संघातील खेळाडूंना फितवून ते संघ कमकुवत केले जात आहेत. निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्याची मागणी ‘त्या’ पेठेत असणाऱ्या संबंधित कार्यकर्त्याने संघांच्या वतीने निवेदनातून केली होती. त्या निवेदनावर शिक्षणाशी संबंधित असलेल्या त्या निमसरकारी संस्थेतून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्याने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. ज्यांच्यावर त्या संस्थेने फुटबॉल संघाची जबाबदारी सोपवली होती, त्यांच्याबाबत ही माहिती मागवली होती. ते, फुटबॉलशी संबंधित असलेल्या दुसऱ्या पेठेतील आहेत. त्यांनी आज दूरध्वनीवरून कार्यकर्त्याला भेटण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी कार्यकर्त्याने महापालिका आयुक्तांसोबत बैठक असल्याने दुपारपर्यंत भेटू शकत नाही, असे सांगितले. कार्यकर्ता महापालिकेत असल्याचे समजताच ते काहीजणांसमवेत महापालिकेत आले. अतिरिक्त आयुक्त कार्यालयात बैठक सुरू असल्याचे समजताच कार्यालयाबाहेर ते थांबून होते. दुपारी एकनंतर ‘तो’ कार्यकर्ता बैठकीतून बाहेर पडताच पेठेतील काही जणांनी तिथेच मारहाण करत त्याला महापालिकेच्या चौकात आणले. तेथेही मारहाण करत महापालिकेबाहेर नेले. कार्यकर्त्यांसोबत असलेल्या इतरांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवले. शिवीगाळ व आरडाओरडीमुळे महापालिकेत गोंधळ उडाला. सर्व कर्मचारी चौकात जमा झाले. या प्रकाराचा व्हिडिओही व्हायरल झाला; पण घटनेबाबत रात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.