
सदृढ समाजरचनेसाठी पत्रलेखन महत्वाचे
ich201.jpg
इचलकरंजी ः वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करताना प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे, धर्मराज जाधव, सौ. संगीता पाटील आदी.
---------------
सदृढ समाजरचनेसाठी पत्रलेखन महत्त्वाचे
प्रसाद कुलकर्णी ः इचलकरंजीतील कन्या महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी, ता. २० ः सदृढ समाजरचनेसाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात तयार झालेले, होऊ घातलेले महत्त्वाचे प्रश्न वाचकांच्या पत्रव्यवहाराद्वारे मांडले जाणे महत्त्वाचे असते. समाज स्वास्थ्याच्या आणि राष्ट्र बांधणीच्या दृष्टीने सजग नागरिकांनी या माध्यमातून व्यक्त होणे गरजेचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघातर्फे आयोजित वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील होत्या. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे म्हणाले, ‘वृत्तपत्र पत्रलेखनाची दखल समाज, शासन, प्रशासन या सर्व पातळ्यांवर घेतली जाते. व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे व दिशा देण्याचे काम पत्रलेखक करीत असतो. नवे पत्रलेखक घडवण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरत असतात.’
प्रा. पाटील म्हणाल्या, ‘पत्रलेखनाचे महत्त्व आजच्या माध्यमांच्या भाऊगर्दीच्या काळातही फार महत्त्वाचे आहे. आपण केलेल्या मांडणीची नोंद समाज घेत असतो. आपण वैचारिकदृष्ट्या व्यक्त होणे फार महत्त्वाचे असते. या वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेतून योग्य तो बोध घेऊन विद्यार्थिनींनी लिहिते झाले पाहिजे.’
प्रारंभी महामानवांना अभिवादन करून व रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेला सुरुवात झाली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी करून दिला. ज्येष्ठ पत्रलेखक मनोहर जोशी, महेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका कुंभार यांनी केले. आभार प्रा. प्रतिभा पैलवान यांनी मानले.