कृषीपंप वीज जोडणीची संपणार प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषीपंप वीज जोडणीची संपणार प्रतीक्षा
कृषीपंप वीज जोडणीची संपणार प्रतीक्षा

कृषीपंप वीज जोडणीची संपणार प्रतीक्षा

sakal_logo
By

कृषिपंप वीज जोडणीची संपणार प्रतीक्षा
‘आंबेओहोळ’ लाभक्षेत्र : नव्या पाच एमव्हीए जनित्राद्वारे वाढणार उपकेंद्राची क्षमता
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : वीज उपकेंद्राची क्षमता संपल्याने पाणी असूनही आंबेओहोळ प्रकल्प लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीज जोडणीचे काम प्रलंबित होते. परंतु आता या उपकेंद्रावर ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन विद्युत जनित्र (ट्रान्‍स्‍फॉर्मर) बसवण्यात येणार असल्याने शेतकऱ्‍यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. या जनित्राचे काम निविदा प्रक्रियेच्या टप्प्यावर आहे.
गतवर्षीपासून आंबेओहोळ मध्यम प्रकल्पात पाणीसाठा सुरू केला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्‍यातून कृषीपंप बसवण्याकडे कल वाढला आहे. परिणामी उत्तूर वीज उपकेंद्रातील वीजपुरवठ्याची क्षमता संपल्याने वैयक्तिक व पाणी वापर संस्थांच्या कृषीपंपांना नवीन कनेक्शन मिळण्यात अडचणी येत होत्या. या उपकेंद्रातंर्गत २० ते २५ वीज जोडणीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. दरम्यान, महावितरणच्या पाठपुराव्यामुळे कृषी निधीतून या उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे विद्युत जनित्र खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रतीक्षेतील शेतकऱ्‍यांच्या कृषिपंपाला वीज जोडणी मिळणार आहे. त्यादृष्टीने वीज कंपनीकडून नवीन जोडणीची प्रक्रिया सुरूही केली आहे.
दरम्यान, मासेवाडी येथे ज्या योजनेतून नवीन उपकेंद्र मंजूर झाले आहे, ती योजना बंद पडल्याने त्यासाठी आता निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी आता वीज बिलातून जमा झालेल्या ३० टक्के राखीव कृषी निधीतून तरतूद करणे आवश्यक आहे. त्याला पालकमंत्र्यांच्या शिफारशीची गरज आहे. आमदार हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे वीज कंपनीचा पाठपुरावा सुरू आहे. लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने या प्रश्‍नाचा पाठपुरावा केला तरच हे उपकेंद्र पूर्णत्वाच्या दृष्टीपथात येणे शक्य आहे.
---------------
* आजरा उपकेंद्रातही ‘वेटिंग’
आजरा वीज उपकेंद्राचीही क्षमता संपल्याने नवीन वीज जोडणी बंद आहे. यामुळे या उपकेंद्रातंर्गत २० हून अधिक औद्योगिक आणि कृषी पंपाच्या वीज जोडणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मासेवाडीचे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास आजरा उपकेंद्रावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठीही लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आवश्यक आहे.
----------------
उत्तूर वीज उपकेंद्रातील नव्या विद्युत जनित्रातून पाच हजार एच.पी. पर्यंतचा वीजपुरवठा करणे शक्य आहे. हे काम निविदेच्या टप्प्यात आहे. हे नवे जनित्र कार्यान्वित झाल्यानंतर आंबेओहोळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्‍यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात येईल.
- दयानंद कमतगी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण आजरा