केएमटी बसला लागली आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी बसला लागली आग
केएमटी बसला लागली आग

केएमटी बसला लागली आग

sakal_logo
By

77201
--------

धावती केएमटी बस पेटली

शिवाजी रोडवरील भर दुपारची घटना डिझेल गळतीने लागली आग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २१ ः रहदारीच्या शिवाजी रोडवर आज भर दुपारी केएमटी बसला आग लागली. टाकीतून डिझेल गळत असल्यामुळे वायरिंग जळून ही आग लागली. स्थानिक आणि केएमटी कर्मचाऱ्यांनी पावडर मारून आग वेळीच विझविल्यामुळे मोठा अनर्थ ठरला. अग्निशमन विभागाकडे याची नोंद झाली असून सुमारे पाच ते दहा हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महिन्यात तीन वेळा केएमटी बस निकामी होऊन अपघात झाले आहे. त्यामुळे केएमटी बसमधील प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. नादुरुस्त केएमटी बसेसचे प्रमाण वाढत आहेत. आजच्या अपघातात केएमटी बसमधील वायरिंग पूर्णपणे जळाले आहे. डिझेलच्या टाकीतून पडलेल्या थेंबामुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलातून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, छत्रपती शिवाजी पुतळा-बिंदू चौकमार्गे -कसबा बावडा ही बस दुपारी दीडच्या सुमारास शिवाजी रोडवर आली. तेथे बसमधून धूर येऊ लागला. त्यामुळे रस्त्यावरील लोकांनी याची कल्पना चालकाला दिली. बस थांबताच बसने पेट घेतला. स्थानिकांनी तातडीने अग्‍निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमनचा बंब जागेवर पोचला. दरम्यानच्या काळात अग्निशमन पावडरचा वापर करून आग विझवली होती. तसेच अग्निशमन दलाच्या योगेश जाधव, पुंडलिक माने, मेहबूब जमादार या जवानांनी धुमसत असलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली. यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
--------

‘केएमटी’ साठी धोक्याची घंटा...

धावत्या केएमटी बसला महिन्यात तीन वेळा अपघात झाले आहेत. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चाक निकामी होऊन एका मोटारीवर आदळले होते. या अपघातात एक जखमी झाला. यानंतर पुन्हा केएमटी बसचा रॉड तुटल्यामुळे अपघात झाला. आज शहरातील मध्यवर्ती आणि रहदारीच्या ठिकाणी आग लागली. त्यामुळे नादुरुस्त केएमटी बसेस रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी धावत असल्याचे अधोरिखित होत आहे. मोठी हानी टाळण्यासाठी केएमटी प्रशासनाने ही धोक्याची घंटा समजून याकडे गांभीर्यांने पाहण्याची गरज आहे.