केएमटी स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी स्थिती
केएमटी स्थिती

केएमटी स्थिती

sakal_logo
By

केएमटी फोटो वापरणे
---
केएमटी झाली ‘अनकंट्रोल ’
दुर्लक्षामुळे स्थिती; प्रशासनाने हातपाय हलवले नाहीतर भवितव्य अंधकारमय

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः डिझेल गळती, धावत्या बसची चाके निघणे, क्लचप्लेट रस्त्यात खराब होण्यासारखे प्रकार केएमटीतील देखभालीकडे होत असलेले दुर्लक्षच दाखवत आहेत. टायर पंक्चर, ॲक्सल तुटल्यानंतर आता या प्रकारांनी बस बंद पडण्याचा वा अपघाताचे होत असलेले प्रकार म्हणजे यंत्रणेकडून नीट काम केले जात नाही वा त्यावर कोणाचे लक्ष नाही असेच सूचित करत आहेत. महापालिकेकडून मदत होत आहे म्हणून स्वतःचे हातपाय हलवायचेच नाहीत हा प्रकार केएमटीचे भवितव्यच अंधकारमय करणारे आहेत.

केएमटी तोट्यात असल्याने महापालिका मदत करत आहे. महिन्याला जवळपास एक कोटीहून अधिक केएमटीला दिले जात आहे. त्यातून यंत्रणा सुरू आहे. पण, बसची देखभाल नीट होण्यासाठी आवश्‍यक असलेले लक्ष मात्र अजून दिले जात आहे असे दिसत नाही. यापूर्वी टायरअभावी अनेक बस वर्कशॉपमध्ये अडकलेल्या असायच्या. मध्यंतरी टायर रिमोल्‍डिंग एसटीकडून करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर टायर खराब होण्याचे प्रमाण कमी झाले. ते कमी झाल्याने इतर देखभालींकडे पूर्ण लक्ष दिले जाईल, असे वाटत होते. पण, गेल्या आठवड्याभरात झालेल्या प्रकारांमुळे ती अपेक्षा फोल ठरली आहे.
सध्या ७० बस मार्गावर असतात. दिवसभर फिरल्यानंतर उद्या सकाळी त्या बाहेर पडण्याआधी त्या बसमध्ये जे काही दुरूस्त करण्यासारखे वाटते ते ठीक करणे गरजेचे आहे. चालकाकडून त्याचे संकेत दिले जातात. त्याच्या दुरुस्तीसाठी जे लागेल ते साहित्य उपलब्ध करून देणे वा देखभालीसाठी लागणारी सक्षम यंत्रणा उभी करणे हे प्रशासनाचे काम आहे. एका बसची दोन चाके निखळली गेल्यानंतर त्याची तातडीने जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांची कानउघाडणी व्हायला हवी. त्यानंतर डिझेल गळतीतून आग, क्लचप्लेट खराब हे प्रकार झाले. यामुळे यंत्रणेने सतर्कपणे काम करण्यास सुरूवात केलेली नाही असेच स्पष्ट होते. कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारावर चालणारे प्रशासन, घडणारे प्रकार कशामुळे होत आहेत त्याच्या तांत्रिक माहितीचा अभाव याचा परिपाक सध्या दिसत आहे.

चौकट
मदतीचा व्हेंटिलेटर काढल्यास...
महापालिकेचीही आर्थिक स्थिती भक्कम नसताना दर महिन्याला एक कोटीहून अधिक रकमेची दिली जात असलेली मदत म्हणजे व्हेंटिलेटर आहे. ती काढून घेतल्यास केएमटी चालणारच नाही. ही स्थिती बदलण्यासाठी केएमटी प्रशासनाने सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आस्थापनावरील अनावश्‍यक खर्च कमी करणे, उपलब्ध यंत्रणेकडून काटेकोरपणे काम करून घेण्याला प्राधान्य द्यायला हवे. ते घडताना दिसत नाही.